मल्लांची आचारसंहिता

पै. गणेश मानुगडे,[email protected]

 प्रत्येक खेळाचे स्वतचे नियम असतात. मल्लयुद्धाचेही तसेच कठोर आणि आरोग्यदायी नियम आहेत.

मल्लयुद्ध हे येऱया गबाळ्याचे काम नाही, वाटेल त्याने उठावे आणि खेळावे असा लेचापेचा खेळ नव्हे हा. तेथे पाहिजे जातीचे. येऱया गबाळ्याचे काम नोहे.

मल्लांची आचारसंहिता पुढीलप्रमाणे असावी.

हिंदूधर्मातील ‘मल्लपुराण’ हा प्राचीन ग्रंथ मल्लांच्या आचारसंहितेबद्दल विस्तृत वर्णन सांगतो. यात सनातन हिंदू धर्मात मल्लांची आचारसंहिता सांगितली आहे, म्हणजे हजारो वर्षांपूर्वी कुस्तीत आपल्या बापजाद्यांनी या विषयात पीएचडी केली होती हे सिद्ध होते.

ती आचारसंहिता अशी… मल्लाने नेहमी थंड पाण्याने आंघोळ करावी. साखर मिसळून दूध प्यावे. रसाळ द्राक्षे सेवन करावी. श्वेत वस्त्र परिधान करावीत.  चंदन आणि कापूर याची उटी अंगास लावावी.  तिखट, कडू, अती आंबट पदार्थ वर्ज्य करावेत.

मल्लांची दिनचर्या

मल्लांनी सूर्योदयापूर्वी उठावे. आपले अंथरूण आपणच काढून ठेवावे.

जिथे झोपलो ती जागा स्वतःच्या हाताने झाडून साफ करावी. जमिनीचे दर्शन घ्यावे. त्यानंतर मुखमार्जन आणि प्रातर्विधी उरकावेत.

 थंड पाण्याने स्नान करावे, नंतर तालमीत जावे. नित्याचा व्यायाम करावा.

आजारी, तापट, माथेफिरू व मद्यपी लोकांदेखत मुळीच व्यायाम करू नये. अष्टमी, पितृपंधरवडा, शुक्लप्रतिपदा, अश्विन शुद्ध अष्टमी, अक्षयनवमी, सूर्य आणि चंद्र ग्रहण, अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी मल्लाने व्यायाम करू नये असा प्राचीन संकेत आहे.

 स्त्रीयांच्या देखत व्यायाम करणे हा निषिद्ध असतो.

मेहनतीचे प्रकार

मल्लांनी करावयाच्या व्यायामाला श्रम किंवा मेहनत असे म्हटले जाते. ती तीन प्रकारची असते.

पूर्णश्रम,अर्धश्रम,अल्पश्रम.

मार्गशीर्ष व चैत्र हा काळ पूर्णश्रमासाठी

वैशाख ते आषाढ हा काळ अर्धश्रमासाठी

आणि श्रावण ते कार्तिक हा काळ अल्पश्रमासाठी योग्य गणला जातो.

श्रमास सुरुवात करताना लंगोट कसावा. मल्लविद्येच्या आदिदेवतेची अर्थात महाबली हनुमंताची प्रार्थना करावी. नंतर आखाडय़ातील माती अंगावर घ्यावी.तद्नंतर श्रमास प्रारंभ करावा. अंगमर्दन करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अंगमर्दनाला संस्कृतमध्ये उद्वर्तन आणि फारशीमध्ये मालिश म्हणतात.

अंगमर्दनाचे बारा प्रकार आहेत. अंगमर्दनामुळे अंगातील वात, कफ, चरबी इत्यादींचा नाश होतो. त्याचप्रमाणे अंगाला उठणारी खाज नाहीशी होते. घामाचा निचरा होऊन दमदारपणा वाढतो. मल्लाने थंड पाण्याने स्नान केल्याने शरीरातील लहान रंध्रे मोकळी होऊन शरीरात उत्साह जाणवतो. रक्ताभिसरण सुधारते.

wrestler-1

मल्लांचा आहार

ऋतुमानाप्रमाणे बदलता आहार घेणे मल्लांच्या फायद्याचे असते. भाजीपाला, फळे, दही, तूप इत्यादी शक्तिवर्धक पदार्थ आहारात ठेवावेत.

मांस हे प्राचीन मल्लविद्येत वर्ज्य आहे.

शाकाहारी मल्लांची एक अनोखी मांदियाळी तत्कालीन हिंदुस्थानात अस्तित्वात होती.

गुरू

मल्लांना गुरू करावा लागत असे. त्याला मातीकार म्हणतात किंवा आजच्या परिभाषेत वस्ताद.

गुरू हा वेगवेगळ्या बत्तीस कलात निष्णात हवा.

मल्लांना मल्लविद्येचे शिक्षण अतिशय समर्थपणे देता आले पाहिजे. ‘पाणी पिजिये छानकर और गुरू किजिये जानकर’!