खणखणीत नाणे!

>> ज्योत्स्ना गाडगीळ

नाणे खणखणीत असेल, तर सहज कोणाचेही लक्ष जाते. परंतु, ते नाणे चलनात असेपर्यंतच आपल्या लेखी त्याला किंमत असते. एरव्ही चलन बंद होताच आपण ते घाईघाईने बँकेत जमा करतो (गेल्या वर्षीचा प्रसंग लगेच आठवला असेल ना?) मग जुनी नाणी संग्रही ठेवण्याचा प्रश्नच मिटला! मात्र वसई येथे राहणारे पास्कल लोपीस नावाचे गृहस्थ गेली अठरा वर्षे नाण्यांचा संग्रह करत आहेत, ज्यात मौर्य, मुघल, पोर्तुगीज, मराठा, ब्रिटिशकालीन अशा तब्बल २००० नाण्यांचा समावेश आहे. ती नाणी सोने, चांदी, ब्रॉन्झ, तांबे, शिसे इ. धातूंची आहेत. पास्कल केवळ नाण्यांचा संग्रह करून थांबले नाहीत, तर नाणेशास्त्रावर ते पीएच.डी करत आहेत आणि लेखन, प्रदर्शने, व्याख्याने अशा माध्यमातून लोकांपर्यंत हा विषय पोहोचवत आहेत.

पास्कल हे व्यवसायाने संगणक अभियंता आहेत. त्यांच्या वडिलांना नाणीसंग्रहाचा छंद होता, पण काही आर्थिक अडचणींमुळे त्यांना ती नाणी विकावी लागली. ही गोष्ट कळल्यावर पास्कल ह्यांना अतिशय वाईट वाटले. त्या विषयाची माहिती नसतानाही वडिलांचा छंद आपण जोपासायचा, असा त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी निश्चय केला.
बालपणी लपंडाव खेळत असताना मित्राच्या घरी पोटमाळ्यावर पास्कल ह्यांना जुने नाणे सापडले. ती होती, १९१३ सालातील ब्रिटिशकालीन पावली! नाणेसंग्रहाचा विषय डोक्यात ताजा असतानाच ते जुने नाणे सापडल्याचा पास्कल ह्यांना आनंद झाला. त्यांनी मित्राची व त्याच्या घरच्यांची परवानगी घेऊन ते नाणे हस्तगत केले. आपल्या मुलालाही आपल्यासारखाच नाणेसंग्रहाचा छंद जडलेला पाहून पास्कल ह्यांच्या वडिलांनी त्यांना चर्चगेट येथील खादी भांडारात नेले. तिथे दहा-बारा जुनी नाणी खरेदी करून पास्कल ह्यांच्या नाणेसंग्रहात भर घातली. शिवाय ते जिथे कामाला होते, तेथील पानवाल्याकडे अनेक ब्रिटिशकालीन नाणी पडिक होती. वर्तमानातील त्यांची किंमत मोजून पास्कल ह्यांच्या वडिलांनी ती नाणी खरेदी केली आणि मुलाच्या हाती सुपूर्द केली. पास्कल ह्यांच्या छंदाबद्दल कळताच त्यांच्या मित्रांनीही घरी वापरात नसलेली जुनी नाणी मित्राला भेट दिली.

वाढत्या वयात पास्कल ह्यांचे नाणेसंग्राहकातून अभ्यासकात रूपांतर होऊ लागले. नाण्यांवरील चित्रांबद्दल कुतूहल वाटू लागले. वेगवेगळी मासिके वाचत असताना त्यांच्या हाती एक लेख लागला, `बिग मनी फॉर स्मॉल चेंज’! शानू बिजलानी ह्यांनी लिहिलेला तो लेख वाचून पास्कल ह्यांना आणखी काही नाणीसंग्राहकांची माहिती मिळाली. त्यांची उद्दिष्टे कळली, अभ्यास कळला. त्या नाणेसंग्राहकांशी आपला संपर्क व्हावा, म्हणून पास्कल ह्यांनी बिजलानी यांच्याशी पत्रव्यवहार करून नाणेसंग्राहकांचा संपर्क मिळवला. पैकी मुकुंद प्रभू नावाच्या नाणेसंग्राहकांनी पास्कल ह्यांना बरेच मार्गदर्शन केले. त्यांच्या सांगण्यानुसार पास्कल ह्यांनी पी.एल.गुप्ता ह्यांचे `कॉईन्स’ नावाचे पुस्तक वाचले आणि कायमस्वरूपी संग्रही ठेवले. आपल्याकडील नाण्यांचा खुलासा करण्यासाठी नाण्यांवर कागद ठेवून पेन्सिलीने त्यावर गिरवित नाण्यांचे छाप पाडून पत्राद्वारे पाठवत असत. त्यावर मुकुंद प्रभू पत्राने प्रत्युत्तर पाठवत असत. अशी खटपट करून पास्कल ह्यांनी अनेक तज्ज्ञांकडून नाण्यांबद्दल माहिती गोळा केली.

पास्कल ह्यांची ह्या विषयातील गती पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना नाशिक येथील `इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन न्युमिस्मॅटिक स्टडी’ ह्या संस्थेत पाठवले. तिथल्या ग्रंथालयात नाणेसंदर्भात कोणतेही भारतीय पुस्तक उपलब्ध असे. (सध्या तिथे ह्या विषयातील ८०,००० पुस्तके आणि लेख उपलब्ध आहेत.) शिवाय अनेक नाणी तिथल्या संग्रहालयात ठेवली होती. माहितीचा एवढा मोठा स्रोत पाहून पास्कल ह्यांनी मुंबई विद्यापीठातून `नाणेशास्त्र’ ह्या विषयात रीतसर शिक्षण घ्यायचे ठरवले आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. आता सखोल अभ्यास करण्यासाठी ते `पोर्तुगीज काळातील नाणी आणि मराठा युद्धाचा तत्कालीन प्रभाव’ ह्या विषयात पीएच.डी करत आहेत.

पीएच.डी साठी हा विषय निवडण्याचे कारण विचारले असता पास्कल सांगतात, `इतिहास माझा आवडीचा विषय. त्यात वसई गाव हे ऐतिहासिक ठिकाण आहे. सुदैवाने माझे बालपण तिथे गेल्याने वसईचा इतिहास, भूगोल मला परिचित आहे. नाणेसंग्रहाचा छंद लागल्यापासून वसई किल्ल्याशी माझी जवळीक वाढली, कारण वसई किल्ल्यात टांकसाळ होती. १७३४ मध्ये तिथल्या टांकसाळीत छापला गेलेला शिसे ह्या धातूचा पैसा माझ्या संग्रहात आहे. तसेच १७७० मध्ये त्याच जागी मराठ्यांनी पाडलेला डबल पैसा, एक पैसाही मला मिळाला आहे, मात्र अर्धा पैसा अजून मला मिळाला नाही. ही नाणी तिथे पाडली गेली, याची खूण म्हणजे नाण्यावरील छपाई! पोर्तुगीज वसईचा उच्चार `बकॅम’ करत असत आणि तिथे पाडलेल्या नाण्यांवर खूण म्हणून `बी’ हे अद्याक्षर छापत असत, त्याला `मिंट मार्क’ म्हणतात. आजही आपल्याकडे असलेल्या शिक्यावर रुपयाच्या खाली टिंब असतो, एक टिंब म्हणजे मुंबईत छापलेला शिक्का, तर टिंब नसलेला कोलकाता येथे छापलेला शिक्का! ही नाणेशास्त्राची भाषा आहे. ती अवगत केल्यावर नाण्यांचे बारकावे कळतात. वसईत सापडलेल्या नाण्यांवर पोर्तुगीजांची खूण आढळली, तर काही नाण्यांवर मराठ्यांची! कारण, चिमाजी अप्पांनी वसईचा किल्ला जिंकल्यावर मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या नाण्यांवर मराठा मोहोर उमटवून घेतली. त्या नाण्यांवर `प्रांत साष्टी’ असे लिहिलेले असे. तिच मोहोर किल्ल्याच्या दारावरदेखील बघायला मिळते. नाण्यांमुळे वसई किल्ल्याची मला नव्याने ओळख होऊ लागली, तोच इतिहास सविस्तर कळावा आणि लोकांना सांगता यावा, यासाठी मी सदर विषय पी.एच.डी.साठी निवडला, त्यासाठी डॉ. सूरज पंडित ह्यांचे अमूल्य मार्गदर्शन मला मिळत आहे.’

explaining-coins

`नाणेसंग्रह’ ह्या एका विषयामुळे पास्कल ह्यांची शेकडो नाणेसंग्राहकांशी ओळख झाली. मुंबईतील नाणेसंग्राहकांनी मिळून `मुंबई कॉईन सोसायटी’ नावाची संस्था काढली. त्या संस्थेतर्फे सप्टेंबर महिन्यात नाणेसंग्राहकांचे तीन दिवसीय संमेलन भरवले जाते. ३००-४०० नाणेसंग्राहक त्या संमेलनास उपस्थित असतात. त्यावेळी ह्या विषयावर चर्चासत्रे, व्याख्याने आयोजित केली जातात आणि विचारांचे, अनुभवांचे तसेच नाण्यांचे आदान-प्रदान केले जाते.

`नाणे’ आणि `इतिहास’ ह्याबद्दल लोकांना आस्था वाटावी, म्हणून पास्कल अनेक प्रदर्शने भरवतात. मुंबई विश्वविद्यालयाच्या पुरातत्त्व विभागाच्या वर्धापनदिनाला मागील तीन वर्षांपासून ते नाणेप्रदर्शन भरवत आहेत. तसेच १३ मे रोजी `वसई विजय दिना’निमित्त वसई किल्ल्यात प्रदर्शन भरवतात. याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी, कार्यक्रमानिमित्त पास्कल ह्यांच्या संग्रहित नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. एवढेच नाही, तर त्यांच्या प्रदर्शनातील रोचक माहिती ऐकून राज्यपाल सी. विद्यासागर राव ह्यांनी वैयक्तिक भेट घेऊन हा विषय पास्कल ह्यांच्याकडून सविस्तर समजावून घेतला होता.
वसई किल्ल्याचा इतिहास आजच्या तरुणांना कळावा, म्हणून ते तरुणांना सोबत घेऊन किल्ल्याची मोफत सफर आयोजित करतात. अभ्यासकांना तसेच नव्या पिढीला ह्या विषयाची तोंडओळख व्हावी म्हणून त्यांनी एक छोटासा माहितीपटदेखील तयार केला आहे. शाळा, महाविद्यालयातून तो माहितीपट दाखवून मुलांना इतिहासाशी जोडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे पास्कल ह्यांनी लेखनाच्या माध्यमातूनही नाणेशास्त्राचा प्रचार-प्रसार केला आहे. सोशल मिडियावरही वेळोवेळी ते माहितीपर पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या लेखनामुळेही अनेक चिकित्सक मंडळी पास्कल ह्यांच्याशी जोडली गेली आहेत. वाचकांच्या माहितीचा आपल्या प्रबंधलेखनाला हातभार लागत असल्याचे पास्कल सांगतात. याबाबत ते एक आठवण सांगतात, `माझ्या अनेक वाचकांपैकी दादरचे मनोहर पै धुंगट ह्यांनी माझ्या छंदाची प्रशंसा करत माहितीपर काही पुस्तके वाचण्यासाठी सुचवली. वाचनाची आवड असल्याने मीदेखील ती पुस्तके हुडकून काढली. दुग्गल, ह्यांनी स्वत:च्या संग्रही असलेली काही पुस्तके भेट दिली. पैकी लेखिका विजया गुपचुप ह्यांचे `सेंट थॉमसस कॅथेड्रल बॉम्बे’ ह्या पुस्तकाने माझ्या नाणेसंग्रहात स्टँम्पसंग्रहाची भर घातली. तत्पूर्वीही मी गंमत म्हणून अनेक आकर्षक स्टँप जपून ठेवले होते, परंतु ह्या पुस्तकात स्टँपबद्दल दिलेल्या रोचक माहितीमुळे माझ्या स्टँम्पसंग्रहाला दिशा मिळाली. मदर तेरेसा ह्यांच्याबद्दल मला आदर होताच, परंतु जिवंतपणी ज्यांच्या नावे स्टँप तयार केला गेल्याचे वाचून आदर आणखी वाढला. ही माहिती पुस्तकात मिळाली, त्या दिवसापासून मी मदर तेरेसांचे स्टँम्प गोळा करू लागलो. एकूण ५००-६०० स्टँप त्यांच्या संग्रहात आहेत, पैकी मदर तेरेसांचे देश-विदेशातले एकूण १०० स्टँप आहेत. अनेक प्रदर्शनांतून त्यांनी ते स्टँम्पही मांडले आहेत.’

पुढील काळात त्यांना आपल्याकडे असलेला माहितीचा खजिना पुस्तक स्वरूपात खुला करून द्यायचा आहे. त्यादृष्टीने त्यांचे लिखाणही सुरू आहे. नोकरी सांभाळून आठवड्याच्या दोन सुट्यांपैकी एक दिवस ते नाण्यांना, वाचनाला, अभ्यासाला देतात, तर एक दिवस आपल्या कुटुंबाला देतात. त्यांच्या पत्नीलाही वाचनाची आवड असल्याने, दोघांनी मिळून घरातच एक ग्रंथालय सुरू केले आहे. त्यात विविध विषयांवर आधारित शेकडो पुस्तके आहेत. ज्यात प्रामुख्याने नाणे आणि वसईचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकांची संख्या जास्त आहे.

वडिलांचे स्वप्न पूर्ण करता करता, नाणेशास्त्र विषयाचे अभ्यासक, संग्राहक आणि लेखक होण्याची संधी पास्कल ह्यांना मिळाली. ती जबाबदारी ते समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांचे नाणे खणखणीत आहे, त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात ते लोकांचे लक्ष वेधून घेणार आहेत, ह्यात शंका नाही.

नाणेशास्त्राची तोंडओळख असणाऱ्यांसाठी खोटे नाणे ओळखण्याच्या काही टिप्स :

१. कॅलिग्राफीत आणि फॉन्टमध्ये फरक
२. नाण्याचे वजन
३. तारीख आणि वर्ष याचा ठराविक आकार
४. नाणे जमिनीवर पडल्यावर येणारा आवाज.
५. नाण्यावरील रेषा, किनार आणि टिंब यातील फरक.