नाशिकमध्ये थंडीचा कडाका कायम; उगाव 1, कळवण 2, नाशिक 5 अंश सेल्सिअस

4

सामना प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी थंडीची तीव्र लाट जाणवत होती. कालच्या तुलनेत एक अंशांनी किमान तापमान वाढले असले तरी गारठा कायम होता. निफाड तालुक्यातील उगावला 1, कळवणला 2.6, कुंदेवाडीत 3, तर नाशिकला 5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

दरवर्षी जानेवारीच्या अखेरीस थंडी कमी होत जाऊन उष्णतेची तीव्रता वाढत जाते. मात्र, या हंगामात तीनदा थंडीची लाट आली. दोन दिवसांपासून गारठल्यागत वातावरण आहे. निफाडच्या उगाव येथे 30 डिसेंबरला आणि काल 9 फेब्रुवारीला पारा शून्यावर घसरला. आज पहाटे 5.30 वाजता 1 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले, अशी माहिती शेतकरी तुषार कोल्हे यांनी दिली. कळवण तालुक्यातील मानूर येथे शेतकरी धनंजय जाधव यांच्या शेतात किमान 2.6 तापमानाची नोंद झाली. निफाडच्या कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात पारा 3 अंशावर कायम होता. नाशिक शहरात 5 इतके तापमान होते. शनिवारसारखे दवबिंदू गोठले नसले तरी थंडीची लाट द्राक्षांचे नुकसान करणारी असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

मंगळवारी अवकाळी पावसाची शक्यता
शनिवारी व रविवारी थंडीची तीव्र लाट आली होती. सोमवारी पारा 6 अंशांवर राहील. मंगळवारी 12 फेब्रुवारीला नाशिक परिसरात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे किमान तापमान 10-11 अंशांवर पोहोचेल. 13 फेब्रुवारीला ढगाळ वातावरण राहील, त्यानंतर पुन्हा तापमान 7 अंशांवर घसरण्याचा अंदाज आहे.