रावेर परिसरात वाढलेल्या थंडीचा केळीच्या बागांना फटका


सतीश नाईक, रावेर

रावेर परिसरात वाढलेल्या थंडीचा फटका तालुक्यातील केळीस बसला असून गत पंधरवड्यात तापमानाचा पारा घसरल्याने वाढलेल्या थंडीने तालुक्यातील केळी बागांवर कमी-अधिक प्रमाणात चरकाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे काल कृषी संशोधन केंद्र जळगाव, तालुका कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुक्यात चरकाग्रस्त केळीची पहणी केली.

डिसेंबरअखेर सतत तापमानाचा पारा १० अंश डिग्रीपेक्षा खाली होता. या मुळे थंडीचा कडाका वाढून त्याचा फटका तालुक्यातील केळीस बसलेला आहे. तापमान कमी झाल्याने वाढलेल्या थंडीमुळे केळी झाडांची मुळांद्वारे अन्नद्रव्य शोषण करण्याची क्रिया मंदावलेली आहे. यामुळे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडाची वरची पाने पिवळसर पडत आहेत व कालांतराने हरितद्रव्याचा नाश होऊन जांभळट पडून नंतर ती काळी पडून जळल्यासारखे दिसत आहेत.

थंडीमुळे चरक्याचा प्रकार तालुक्यात केळी बागांवर कमी-अधिक प्रमाणात दिसून येत आहे. तालुक्यात २० हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्रात केळीची लागवड होते. यात ९ हजार हेक्टर जुनी व १० ते ११ हजार हेक्टर क्षेत्र नवीन (नवती) केळीची लागवड झालेली आहे. यामुळे आज जळगाव येथील केळी संशोधन केंद्र व तालुका कृषी विभागाचे डॉ. के. बी. पवार, तालुका कृषी अधिकारी एस. एस. पवार, मंडळ कृषी अधिकारी एस. आर. साळुंखे पाल, एस. पी. गायकवाड सावदा, चंपालाल पारडे, पी. जी. पाटील राजपूत यांनी आज तालुक्यातील सावदा, वाघोदा, चिनावल, कुंभारखेडा, उटखेडा भातखेडा या भागात जाऊन चरका ग्रस्त केळी बागांची पाहणी केली व यावर उपाय शेतकऱ्यांना सांगितले.