महोत्सवांचे दिवस


सध्या महाविद्यालयांमध्ये महोत्सवाची धूम सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थी कामालाही लागले आहेत. विविध महाविद्यालयांना आमंत्रण पाठवणे, मीडिया पार्टनर शोधणे, स्पॉन्सरशिप मिळवणे, सामाजिक उपक्रम राबवणे, सूचनांचे फलक तयार करणे अशा विविध उपक्रमांमध्ये सध्या विद्यार्थी रमले आहेत. डिसेंबर महिन्यात कॉलेज महोत्सवांना सुरुवात होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने महाविद्यालयांमध्ये फेस्टिव्हल भरवले जातात.

मेकर्स मेला
चालते-बोलते एकापेक्षा एक भन्नाट रोबो… टाकाऊपासून टिकाऊ अशा कलात्मक वस्तू… आणि त्यातून सामाजिक संदेश देणारे उपक्रम पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. विद्याविहारच्या सोमय्याने ११ ते १३ जानेवारी २०१८ला ‘मेकर्स मेला’चे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देतानाच ऑटोमोबाईलपासून इंजिनीअरपर्यंत सर्व प्रकारचे प्रयोगकर्ते, निर्माते आणि डिझायनर यांच्यासाठी हे एक व्यासपीठच आहे. यामध्ये रद्दीच्या पेपर्सपासून इलेक्ट्रॉनिकच्या वापरात नसलेल्या उपकरणांपासून कलात्मक प्रकल्प आहेत. तळागाळातील नवउद्योजकतेला यामुळे प्रोत्साहन मिळते.

टेक्नोवांझा
टेकप्रेमींसाठी अगदी जिव्हाळ्याचा फेस्ट म्हणजे वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजी इन्स्टिटय़ूटचा (व्हीजेटीआय) ‘टेक्नोवांझा’. वेगवेगळ्या विषयांवर तज्ञांची माहितीपर व्याख्यानं, मार्गदर्शनपर कार्यशाळा आणि एकापेक्षा एक भन्नाट स्पर्धा अशी या फेस्टची खास वैशिष्ट्या आहेत. हा फेस्टिव्हल २६ ते २८ डिसेंबर रोजी रंगणार आहे. ‘टेकिंग टेक्नॉलॉजी टू सोसायटी’ असे त्यांचे घोषवाक्य आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी ‘प्रतिज्ञा’सारखा उपक्रम आणि दुसरा उपक्रम ‘मिशन मुंबई’ असे सामाजिक उपक्रम असणार आहेत. व्हीजेटीआयमध्ये सध्या ‘रंगवर्धन’ हा रंगोत्सवही रंगला आहे. मराठी भाषेची जपवणूक करणाऱ्या या सोहळ्याला अभिनेता सुनील बर्वे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रंगवर्धनच्या या नृत्याविष्कारात सोलो, ड्य़ुएट, ग्रुप असे तीनही प्रकारची नृत्ये सादर करण्यात येत आहेत. व्हीजेटीआयच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी दै. ‘सामना’ हा माध्यम प्रायोजक म्हणून आहे.

एसपीचा ‘स्पेक्ट्रा’
रोबो वॉर्स, सुसाट वेगात धावणाऱ्या रेसिंग कारची स्पर्धा, पाण्यातील बोटींची शर्यत अशा थरारक अनुभव देणाऱ्या स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, प्रश्नमंजुषा, पेपर प्रेझेंटेशन, रोबोटिक्स चॅलेंज, कॅड चॅलेंज, रोप क्लाइम्बर, सर्किट मेकिंग अशा एकापेक्षा एक इव्हेंट पाहता येणार आहेत. टेक्नोप्रेमींसाठी पर्वणी असणारा अंधेरी येथील सरदार पटेल इंजिनीअरिंग कॉलेजचा स्पेक्ट्रा २७ आणि २८ जानेवारी रोजी भवन्सच्या परिसरात रंगणार आहे.