जकातनाक्यावर जिल्हाधिकारी भेट देतात तेव्हा…

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

कृषी उत्पन्न बाजार समितीने मच्छिमारांसाठी आकारलेल्या सेसला मच्छिमारांचा विरोध आहे. त्यामुळे कागदेपत्री परिस्थिती न पहाता प्रत्यक्ष पहाणी करण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मॉर्निंगवॉकच्यानिमित्ताने शुक्रवारी भाट्ये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तपासणी नाक्याला भेट देत पहाणी केली. तेथील अडीअडचणी आणि मच्छिमार व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणीही समजून घेतल्या.

रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समितीने मच्छिमार तसेच शेती मालासाठी चेकनाके उभारले आहेत. या चेकनाक्यावरुन होणारी आवकजावक तसेच त्यांच्या असणार्‍या अडीअडचणी जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतल्या. रत्नागिरी शहरानजीक असणार्‍या या कृषी उत्पन्न बाजार समितीने मच्छिमारांकडून सेस घेऊ नये यासाटी मागणी केलेली असताना यावर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने येणार्‍या अडीअडचणी समजावून घेणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट दिली आणि तेथील नोंदवहीत आपली प्रतिक्रिया दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मच्छिमारी केली जाते. तसेच त्याची वाहतूक करताना वाहनांमधून पडणारे पाणी अपघाताला कारणीभूत ठरते. या दृष्टीने कोणती उपाययोजना करता येईल याचीही पहाणी केली. जिल्हाधिकार्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेकनाक्याला भेट दिल्याने तेथील मच्छिमारांमध्ये समाधानाचे वातावरण होते.