विद्यार्थ्यांच्या ‘ब्रेकिंग न्यूज’मुळे प्राचार्यांनी नोकरी गमावली

सामना ऑनलाईन । कंसास

एखाद्या वृत्तपत्राच्या बातमीनं लोकप्रतिनिधींना, अधिकारी-पदाधिकारी यांना पद गमवावं लागल्याच्या अनेक घटना तुम्ही वाचल्या-ऐकल्या असतील. मात्र अमेरिकेत विद्यार्थ्यांच्या वृत्तपत्रानं पोलखोल केल्यानं प्राचार्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं हे वृत्तपत्र चर्चेचा विषय बनलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अनेक महाविद्यालयात विद्यार्थी वृत्तपत्र काढतात. पण महाविद्यालयाच्या कारभाराबद्दल त्यांना फारसं लिहिता छापता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे वृत्तपत्र हे केवळ शोभेचं असतं, अशी प्रतीमा बनली आहे. पण अमेरिकेतील कंसासमधील पिट्सबर्ग हायस्कूलनं (पीएचएस) नवा आदर्श घालून दिला आहे. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ‘द बुस्टर रीडक्स’ या वृत्तपत्राला महाविद्यालयातील गोष्टींवर भाष्य करण्याचं तसंच बातम्या छापण्याचं स्वातंत्र्य आहे. या महाविद्यालयात नुकतीच डॉ. रॉबर्टसन यांना प्राचार्य म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. डॉ. रॉबर्टसन यांची पदवी ही पात्रता निकषांमध्ये बसत नसल्याची माहिती विद्यार्थी पत्रकारांच्या हाती लागली. त्यांनी महाविद्यालयाच्या वृत्तपत्रात ही बातमी छापली आणि हंगामा झाला.

या बातमीच्या आधारावर डॉ. रॉबर्टसन यांना व्यवस्थापकीय समितीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आणि एका रात्रीत त्यांना आपलं पद सोडावं लागलं. डॉ. रॉबर्टसन यांना ६ मार्च २०१७मध्ये नोकरी दिली होती. त्यासाठी त्यांना वर्षाला ९३ हजार डॉलर एवढा पगार दिला होता. मात्र विद्यार्थ्यांच्या या शोध पत्रकारितेमुळे त्यांना नोकरी गमवावी लागली. सध्या अमेरिकेत याची जोरदार चर्चा सुरू असून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.