‘या’ देशात एक दिवस सगळेच होतात आळशी

5

सामना ऑनलाईन । कोलंबिया

आजच्या संगणक युगात आपल्याला सर्व सेवा 24 * 7 हव्या असतात. या सेवा पुरव्यासाठी अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या तीन किंवा चार शिफ्ट लावतात. असे काम करत असताना आळस किंवा थकवा या गोष्टींना मनाई असते. ‘कुछ भी हो जाये यहाँ बस चलते रहना है’ हेच आजच्या जगातले ब्रीदवाक्य आहे. मात्र, एक देश असा आहे जिथे खास एक दिवस आळसासाठी काढण्यात येतो. काही लोक आळसात दिवस काढतात. मात्र, कोलंबियात खास आळसासाठी एक दिवस काढण्यात येतो. कोलंबियातील इतागुई शहरात गेल्या रविवारी ‘वर्ल्ड लेझीनेस डे’ साजरा करण्यात आला.

या देशात आळसाच्या दिवशी आळसाच्या जत्रा भरतात. लोकही मोठ्या संख्येने या जत्रेत सहभागी होतात. या जत्रेत लोक चक्क रस्त्यावर अंथरून पसरून त्यावर झोपा काढतात. तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी आळसासाठी एक दिवस काढण्यात येतो. इतर दिवशी आळस, थकवा या शब्दांना मनाई आहे. मात्र, या दिवशी थकून, कंटाळून आळसात अंथरुणावर लोळायचे असते. गेल्या रविवारी इतागुई शहरात अनेकजण गाद्या आणि अंथरून घेऊन आले होते. रस्त्यावर अथरूण पसरून त्यावर ते लोळत पडले होते. हे दृश्य बघण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक येतात. 1985 पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. गेल्या ३३ वर्षांपासून अखंडितपणे हा दिवस साजरा करण्यात येत आहे.

कोलंबियाच्या इतागुई शहराची लोकसंख्या दोन लाख आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी आणि आराम करण्यासाठी एक दिवस असावा अशी कल्पना मारियो मोंटोयो यांच्या मनात आली. त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली आणि आज हा दिवस साजरा करण्यासाठी जत्रा भरत आहे. स्वतःच्या आराम करण्याच्या विचारातून आळसाच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. आळसाच्या दिवशी येथे विविध स्पर्धा घेण्यात येतात. झोपण्यासाठी कोणाचा पायजमा जास्त चांगला आहे, कोणाचा नाइट सूट चांगला आहे, कोणाचे अंथरूण जास्त सुखावह आहे, कोणाची झोपण्याची स्टाइल जास्त चांगली आहे. आळसाचा दिवस कोणी जास्त एन्जॉय केला, सर्वात लवकर अथंरूणावर कोण झोपले अशा प्रकारच्या मनोरंजन स्पर्धा यावेळी घेण्यात येतात.