रोखठोक : हौतात्म्याची श्रीमंती पायदळी का तुडवता?

rokhthokहिंदुस्थान जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश ठरला. त्या श्रीमंतीचा फुगा शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कश्मीरातील रोजच्या हिंसाचाराने फुटत आहे. शहीदांना धर्म नसतो, पण देशभक्तीला राजकीय पक्षाबरोबरच धर्माचे लेबल लावण्याचे प्रकार सुरू आहेत. मुजाहिद खान कश्मीरात शहीद झाला. त्याचे हौतात्म्य धर्मात तोलले जात आहे काय?

हिंदुस्थान जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश ठरला आहे. लोकांच्या व्यक्तिगत श्रीमंतीवर हे आकडे समोर आले. देशात गरीब आणि गरिबी वाढत असताना व्यक्तिगत श्रीमंती वाढावी हा ‘फकीर’ मोदी यांच्या विचारसरणीचा पराभव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात पाच-पन्नास संस्थानिकांच्या हाती देशाची सत्तासंपत्ती होती. आता ती फक्त शंभर बड्या उद्योगपतींच्या हाती आहे. टिळकांनी एकदा ‘केसरी’त लिहिले होते, ‘‘कोणत्याही देशाला दारिद्रय़ येणे म्हणजे त्यातील संपत्ती नाहीशी होऊन त्यातील लोकांस खाण्यापिण्याची आणि वस्त्रपात्राची मारामारी पडणे. या मारामारीला तीन कारणे असतात. एकतर देशातले लोक सुस्त, निरुद्योगी व अज्ञान असल्यामुळे त्यांच्याकडून मुळीच किंवा व्हावी इतकी संपत्ती उत्पन्न होत नाही. दुसरे कदाचित ते ती उत्पन्न करीत असतील, पण ती कोणीतरी काढून नेत असेल. तिसरे ते जितकी उत्पन्न करतात तिच्यापेक्षा तिचा ‘खर्च’ करणारे अधिक निपजत असतील.’’ टिळकांची ही तिन्ही कारणे आजच्या परिस्थितीतही लागू पडू शकतात.

पायघड्यांचा उपयोग काय?
हिंदुस्थानचे पंतप्रधान परदेशात जातात व परदेशी उद्योगपतींसाठी पायघडय़ा घालतात ते योग्यच आहे, पण ‘‘संपत्ती, आरोग्य व मनःशांतीसाठी हिंदुस्थानात या’’ असे आवाहन ते करतात. हिंदुस्थानात सर्वकाही आहे असे ते सांगतात तेव्हा त्यांचा अभिमान वाटतो, पण परदेशस्थ हिंदुस्थानींसमोर ते हिंदुस्थानातील राजकीय पक्ष व यंत्रणेची ‘भ्रष्ट’ अशी प्रतिमा निर्माण करतात तेव्हा वाईट वाटते. पूर्वी युरोपातले पाद्री लोक हिंदुस्थानचा प्रवास करून तिकडे परत गेले की, अशा गप्पा ताणीत की, ‘‘अहो, हिंदुस्थान म्हणजे काय? फक्त सुवर्णभूमी! कांचनकण तेथील रस्त्यावरील धुळीत सापडतात. तेथील घरांच्या भिंतीत आणि दारासमोरील ओट्यात हिरे-माणके बसविलेले असतात. त्यांचे अन्न चंदनी लाकडांवर शिजवले जाते आणि त्यांच्या अंगाला रेशमाखेरीज दुसरा कपडा लागत नाही.’’ अर्थात हे सत्ययुग होते की बोलघेवडेपणा? पण तेव्हा जे होते ते आता नाही. आता अगदी उलट स्थिती आहे व शेतकरीवर्ग साफ नष्ट झाला आहे.

गुंडांना प्रतिष्ठा
‘‘महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील नाशिक येथे ‘मध्यरात्री’ खास वेळ काढून एका गुंडास भेटले, बंद दाराआड त्यांनी गुप्त चर्चा केली’’ हे वृत्त दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले, पण हेच मंत्री धर्मा पाटीलसारख्या वृद्ध शेतकऱ्याला भेटायला तयार नव्हते. त्यामुळे अनेक धर्मा आत्महत्या करतात. बळीचे राज्य नको तर निवडणुका जिंकण्यासाठी गुंडांचे राज्य हवे. व्यक्तिगत संपत्ती अंबानी, अदानीची वाढेल. जिंदाल, मित्तलची वाढेल. राजकारणी व सत्ताधारी श्रीमंत होतील. मतांचा भाव १०० रुपयांवरून पाच हजारांवर गेला. त्यामुळे ‘मत’ विकणारे लोकशाहीला दुवा देतील व निवडणुकांचा ‘मोसम’ नेहमीच यावा अशी देवाकडे प्रार्थना करतील, पण त्यामुळे गरिबी संपेल काय? शेतकरी जगेल काय?

शेतकरी पुन्हा मेला?
मराठवाडा-विदर्भाचा शेतकरी पुन्हा गारपिटीने व अवकाळी पावसाने नष्ट झाला. ५० हजार हेक्टर शेतीची नासाडी झाली. बागायती व जिरायती उद्ध्वस्त झाली. सरकारने सांगितले, ‘‘नुकसानीचे पंचनामे करू व मदत देऊ.’’ पण राज्यातील अनेक जिल्हय़ांतील कृषी विभाग रिकामे आहेत. तिथे अधिकारी नाहीत, कर्मचारी नाहीत. त्यामुळे पंचनामे कोण करणार? विदर्भ, मराठवाडा भागातील शेतकरी गारपिटीने नष्ट झाला म्हणून मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरी भागांतील गरीब किंवा मध्यमवर्गीय आनंदाने भरारी मारतो आहे असेही नाही. बांधकाम क्षेत्रापासून इतर उद्योगात मंदीची लाट आहे व नोटाबंदीमुळे लाखोंच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे जे लोक सध्याच्या राज्यकर्त्यांचा उदो उदो करीत आहेत ते भ्रमिष्ट झाले आहेत. या देशातील मूठभर लोकांची श्रीमंती वाढली म्हणून दुःख नाही, तर या देशात ७५ टक्के लोक गरिबीरेषेखाली आहेत, शेतकरी व मजुरांना भवितव्य उरले नाही याचे दुःख आहे. श्री. मोदी यांचे जगणे पंतप्रधान असूनही फकिरासारखे आहे असा जो प्रचार होतोय त्याचे वाईट वाटत नाही, तर महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागातील शेतकरी स्वतःला जाळून घेतोय व त्या राखेची फकिरी मला अस्वस्थ करीत आहे.

ही कसली प्रगती!
शंभर लोकांनी श्रीमंत व्हावे व त्याच वेळी कोटय़वधींना अन्न-वस्त्राची भ्रांत पडावी हे प्रगतीचे लक्षण नाही. शेअर बाजार कोसळल्यावर सरकारने चिंताग्रस्त व्हावे व गारपीट झाल्यावरही ‘पंचनामे’ करण्यावर वेळ मारून न्यावी हे बरे नाही. काँग्रेस राजवटीत देशाची घसरगुंडी झाली असे पतंग भाजपचे पंतप्रधान उडवतात, पण गेल्या चार-पाच वर्षांत गरीब वाढले व गरिबीही वाढली. पूर्वीचे राजे उदार होते. आज उदार व दानशूरतेस भ्रष्टाचाराचा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे स्वतःच्या खिशातील चिल्लर खुळखुळवायलाही लोकांना भीती वाटते. रस्त्यावरील भिकाऱयाचेही पोट सहज भरले जात होते. आज भिकाऱयास काही देण्याचीही भीती वाटते. हे अर्थकारण देश गरिबी व दारिद्रय़ाकडे जात असल्याचे चित्र दाखवते.

ढोंगी राष्ट्रवाद
राष्ट्रवाद व राष्ट्रभक्तीच्या बाबतीत आपण किती ढोंगी झालो आहोत याचे दर्शन आता रोजच घडते. जम्मू-कश्मीरमधील सुंजवान येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. कश्मीरात असे हल्ले आता रोजच होत आहेत. या हल्ल्यात शहीद झालेले जवान मुस्लिम होते. ‘‘आता मुस्लिमांच्या देशभक्तीवर शंका घेणारे कुठे आहेत?’’ असा प्रश्न ‘एमआयएम’चे नेते ओवेसी यांनी विचारला व त्यावर एका विशिष्ट वर्गाकडून टीका सुरू झाली. ओवेसी यांची वक्तव्ये व भूमिका यांच्याशी माझे मतभेद आहेत. मुस्लिम समाजातील अज्ञान व धर्मांधता यास खतपाणी घालण्याचे काम ओवेसींसारखे नेते करीत आहेत, पण मुस्लिमांच्या देशभक्तीविषयी कधीच कुणी शंका घेतली नाही. पाकिस्तानी ‘आयएसआय’च्या हनी ट्रॅपमध्ये नौदलाचे दोन अधिकारी सापडले. ते मुसलमान नव्हते तर हिंदू होते हे सत्यही स्वीकारायला हवे. ‘ओवेसी’ यांच्या वक्तव्यांवर लष्कराचे लेफ्टनंट जनरल देवराज अन्बू यांनी लगेच खुलासा केला, ‘‘शहीदांना कुठलाही धर्म नसतो. त्यांच्या बलिदानास आम्ही धार्मिक रंग देत नाही. शहीदांच्या धर्मावर भाष्य करणाऱ्यांना सैन्याची पुरेशी माहिती नसावी’’. हे लष्कराचे म्हणणे बरोबर आहे. प्रश्न इतकाच आहे की, हिंदुस्थानच्या सीमेवर मुसलमान जवानही हौतात्म्य पत्करीत आहेत. शनिवारी एकाच वेळी तीन मुसलमान जवान शहीद झाले. त्यात मुजाहिद खान यानेही बलिदान केले. आरा जिल्ह्यातील पिरो हे त्या जवानाचे गाव. त्याचे पार्थिव गावी आणले तेव्हा त्याला अंतिम निरोप देण्यासाठी शेकडो लोक जमा झाले, पण त्याच्या अंतिम संस्काराला बिहार सरकारचा एकही मंत्री उपस्थित राहिला नाही. हे सोडाच, पण प्रथेप्रमाणे जिल्हाधिकारी व पोलीसप्रमुखाने शहीदांना मानवंदना देण्यासाठी हजर राहायचे असते, पण यापैकी एकही जण शहीदाच्या अंत्यसंस्कारास उपस्थित नव्हता. शहीदांचा हा अपमान आहे. बिहारात राष्ट्रभक्त भाजप व नितीश कुमारांचे राज्य आहे. त्यामुळे हा गुन्हा त्यांना माफ करता येणार नाही. हे काँग्रेस किंवा लालू यादवांच्या राज्यात घडले असते तर राष्ट्रभक्तीचा गजर करीत यापैकी अनेकांनी ‘शहीद सन्मान यात्रा’ काढल्या असत्या. शहीदांना कुठलाही धर्मा नसतो हे खरेच, पण मुजाहिद खानच्या बाबतीत जे घडले ते चिंताजनक आहे. सैनिकांनी, शेतकऱयांनी हौतात्म्य पत्करायचे व राजकारण्यांनी त्या हौतात्म्याचे राजकारण करायचे. मुजाहिद खानच्या अंत्यसंस्कारास जे पोलीसप्रमुख व जिल्हाधिकारी हजर राहिले नाहीत त्यांना तत्काळ बडतर्फच करायला हवे. शहीदांना धर्म नसतो, पण ‘देशभक्ती’चे धर्मकारण सुरू झाले आहे व त्यात अधिकाऱ्यांनी सहभागी होणे हा देशद्रोह आहे!

जगात आपण पैशाने श्रीमंत ठरलो, पण ही श्रीमंती काय कामाची? हौतात्म्याची श्रीमंती पायदळी तुडवण्याची वृत्ती देशाला वाळवी लावत आहे.

ट्विटर – @rautsanjay61
जीमेल – [email protected]