सांस्कृतिक वर्तुळातील आगळी भेट

>> मकरंद जोशी

गेल्या काही वर्षांमध्ये साहित्य संमेलन आणि वादविवाद यांचं नातं म्हणजे ‘फेविकॉल का जोड’ ठरलं आहे. कधी संमेलनाध्यक्षांच्या निवडीवरून तर कधी संमेलनस्थळावरुन… पण वादविवादाचा धुरळा उडाल्याशिवाय मराठी साहित्य संमेलन साजरेच होत नाही. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडय़ात मुंबईत साजरे झालेले ‘ एक असेही साहित्य संमेलन’ मात्र संस्मरणीय ठरले ते संयोजकांच्या पारदर्शक, प्रामाणिक भूमिकेमुळे आणि तितक्याच आपुलकीने सहभागी झालेल्या साहित्यप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे. कोणताही बडेजाव, औपचारिकता आणि थाटमाटापासून हे संमेलन दूर होतं, कारण या संमेलनाची संकल्पना ज्या माणसाची आहे तोदेखील तसाच आहे. आपल्या सर्वमान्य पांढऱयाशुभ्र कपडय़ांसारखाच. आतून बाहेरून निर्मळ, निखळ आणि सच्चा. हा माणूस म्हणजेच नाटय़-चित्रपट आणि साहित्य वर्तुळात आपल्या परखड, स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले अशोक मुळय़े. आपल्या कल्पक आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी मुळय़ेकाका प्रसिद्धच आहेत. त्यांच्या डोक्यातून निघालेलं ‘असंही एक साहित्य संमेलन’… म्हणजे जणू साहित्य संमेलन कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठच आणि हा वस्तुपाठ ते गेली अनेक वर्षे सातत्याने गिरवत आहेत. या वर्षीच्या साहित्य संमेलनाचे निमंत्रित (होय! मुळय़ेकाकांचे संमेलन नेहमीच फक्त निमंत्रितांसाठीच असते!) होते वेगवेगळय़ा दिवाळी अंकांतून लिहिणारे नवोदित साहित्यिक. त्यासाठी काकांनी स्वतः वेगवेगळय़ा दिवाळी अंकांतील लेखक-लेखिकांचे फोन नंबर मिळवून, त्यांना दोन-दोन वेळा फोन करून आमंत्रण दिले होते. या अनोख्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला गेली पंचवीस वर्षे ‘ऋतुरंग’हा अनोखा दिवाळी अंक संपादित करणाऱया अरुण शेवते यांना. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते ज्येष्ठ पत्रकार आणि ग्रंथव्यवहाराची बित्तंबातमी आपल्या सदरामधून सर्वांपर्यंत पोहोचवणारे रविप्रकाश कुलकर्णी. या दोन नावांनीच मुळय़ेंच्या साहित्य संमेलनाचे वैशिष्टय़ स्पष्ट होते. संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत उपस्थित होते तेही मुळय़ेंच्या प्रेमाखातर.

या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ‘माझा पुरस्कार’ देण्यात आला. आता पुरस्काराचे हे नाव फक्त मुळय़ेकाकांनाच सुचू शकते. त्याबाबत त्यांची टिप्पणी अशी की, ‘अनेकदा वेगवेगळय़ा कार्यक्रमांत दिलेले पुरस्कार मला पटत नसत. अशावेळी मनातल्या मनात चरफडण्यापेक्षा आपणच एक पुरस्कार सुरू करूया म्हणून हा पुरस्कार मी सुरू केला. त्याचं नावही ‘माझा पुरस्कार ’असं ठेवलं, कारण हा खरोखरच माझा पुरस्कार आहे. शिवाय तो ज्याला मिळणार त्यालाही वाटणार की हा ‘माझा पुरस्कार’ आहे,’ मुळय़ेकाकांची ही संकल्पना किती समर्पक आहे याची साक्ष पुढे पटली. या वर्षीच्या माझा पुरस्काराचे मानकरी तीन होते. एक संमेलनाचे अध्यक्ष अरुण शेवते, जे गेली पंचवीस वर्षे दर्जेदार दिवाळी अंक एकहाती प्रकाशित करत आहेत. मात्र त्याबरोबरच या अंकातील निवडक साहित्याला ते पुस्तकरूपात आणून मराठी साहित्यात कायमचं स्थान देतात याचा उल्लेख मुळय़ेकाकांनी आवर्जून केला. या वर्षी दिवाळी अंकांच्या विश्वात दमदार पदार्पण झाले ते झी मराठीच्या ‘उत्सव नात्यांचा’ या दिवाळी अंकाचे. एकीकडे डिजिटल मीडिया हातपाय पसरत असतानाच, त्याच माध्यमाला मुद्रित माध्यमाकडे वळावंसं वाटलं हे विशेष मुळय़ेकाकांच्या मनात भरले. शिवाय ‘झी’च्या टीमने आपल्या आक्रमक मार्केटिंगने या अंकाच्या तब्बल ७५००० कॉपीज् विकल्या. त्यामुळेच या सगळय़ा टीमला ‘माझा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. ‘माझा पुरस्कार’ची विशेष मानकरी ठरली पनवेलची सृष्टी कुलकर्णी. कॅन्सरच्या जीवघेण्या व्याधीशी झगडताना या महाविद्यालयीन युवतीने चक्क एक कथासंग्रह लिहिला. इतकेच नव्हे तर, जपानी भाषा आत्मसात केली आणि आता कॅन्सरवर मात करून ती पुढची खेळी खेळायला नव्या उमेदीने सज्ज झाली आहे. सृष्टीने पुरस्कार स्वीकारल्यानंतर ‘हा खरोखरच माझा पुरस्कार आहे आणि याने माझा उत्साह अधिकच वाढला आहे ’ असे सांगून या कार्यक्रमामुळे मला नसलेले आजोबा अशोक मुळय़ेंमध्ये मिळाले असं नमूद केलं.

या साहित्य संमेलनाचे कार्यध्यक्ष म्हणून बोलताना रविप्रकाश कुलकर्णी म्हणाले की, ‘मुळय़ेंची दे धडक कार्यशैली मला माहित्येय. त्यामुळे हा कार्यक्रम सुरू होईपर्यंत मला खात्री नव्हती की, मीच स्वागताध्यक्ष असेन. पण मुळय़े तसे शब्दालाही पक्के आहेत, ‘संमेलनाध्यक्ष अरुण शेवते आपल्या मनोगतात म्हणाले की, ‘माझा आणि अशोक मुळय़ेंचा थेट परिचय नव्हता. मी त्यांचे नाव ऐकून होतो. पण अचानक त्यांनी मला फोन करून सांगितले की, या वर्षीच्या ‘असेही एक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष’ तुम्ही आहात. मला वाटतं, बहुधा मीदेखील त्यांच्यासारखा एकांडा शिलेदार आहे म्हणून त्यांना माझा सन्मान करावा असं वाटलं असावं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना भारतकुमार राऊत यांनी सांगितले की, ‘आमच्या संघटनेत जसं आदेश आला की तो पाळायचा असतो, त्याप्रमाणे अशोक मुळय़ेंचा आदेश आला की तो पाळावाच लागतो. म्हणूनच मी आज इथे प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित आहे.

या साहित्य संमेलनात सुरांची सुखद बरसात केली ती सागर सावरकर, नीलिमा गोखले आणि शाल्मली सुखटणकर या त्रयीने. संगीत संयोजक प्रशांत लळित आणि त्यांच्या साथीदारांनी मोजक्या वाद्यांसह मैफिलीत जान आणली. संमेलनात ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्याची ‘न्यूड’ चर्चा’ या विषयावर एक मोकळाढाकळा परिसंवाद झाला. यात मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार,अभिनेते शरद पोंक्षे आणि लेखक, दिग्दर्शक, अभिनेते हृषिकेश जोशी सहभागी झाले. याचे सूत्रसंचालन रविप्रकाश कुलकर्णी यांनी केले. या विषयाची तर्कशुद्ध मांडणी करताना, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची व्याप्ती, त्यामुळे समाजमाध्यमांवर फैलावलेल्या अनिष्ट प्रवृत्ती, यामागील राजकीय-सामाजिक पदर उलगडत स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, त्याची अभिव्यक्ती कशी होते याबाबत चर्चा घडली.

संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अश्विन बापटवर होती, पण मुळय़ेकाकांनी त्यांच्या शैलीत जोरदार बॅटिंग केल्याने अश्विनला फारसा वाव नव्हता. हे संमेलन यथासांग पार पडावे याकरिता ज्यांनी ज्यांनी हातभार लावले त्या सगळय़ांचे मुळय़ेकाकांनी त्यांच्या शैलीत मनापासून आभार मानले. निर्मिती सावंत, गंगाराम गवाणकर, निळू दामले, प्रदीप भिडे, प्रसाद महाडकर, सुरेश खरे, विजय केंकरे, विजय कदम, दिनकर गांगल असे विविध क्षेत्रांतील मान्यवर या संमेलनाला आपापलं वलय बाजूला ठेवून आपुलकीने उपस्थित होते. त्यामुळे २५ डिसेंबरला अशोक मुळय़े या मराठी सांस्कृतिक वर्तुळातील श्वेत वस्त्रधारी सांताक्लॉजने जणू नाताळची आगळीवेगळी भेटच दिली. आणि तीही अशी की, जिच्या आठवणींचा गंध अनेकांच्या मनात कायम ताजा राहील.

(लेखक नाटय़क्षेत्रात कार्यरत आहे)
[email protected] com