अण्णा

>> शिरीष कणेकर

येत्या 15 मार्चला अण्णांना जाऊन 53 वर्षे होतील. त्रेपन्न वर्षे! त्यांच्या पश्चात एवढा काळ मी जगेन, जगू शकेन असं मला वाटलंच नव्हतं. माणसाची जगण्याची इच्छा किती प्रबळ असते नाही? जीव जाता जात नाही. ज्याचा जायचा असतो त्याचा जीव पाखराप्रमाणे भुर्रकन उडून जातो. आमच्यासारखे रडत भेकत, कण्हत कुंथत निर्लज्जपणे जगत राहतात. मरणाची वाट पाहतोय असं आम्ही बोलताना बोलतो, पण प्रत्यक्षात मरण जास्तीत जास्त लांबणीवर कसं पडेल ते बघत खुरडत जगतो. एकतर जगायचं आणि वर तोंड करून बोलायचं.

अण्णांच्या शेवटच्या आजारात मी त्यांना भेटायला जे.जे.ला गेलो होतो. तो त्यांचा शेवटचा आजार ठरेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. जायचं, भेटायचं, बोलायचं आणि परत यायचं. काही दिवसांनी तेही येणारच होते. हॉस्पिटलच्या स्पेशल रूममध्ये आम्ही समोरासमोर आलो आणि काय बोलावं तेच मला सुचेना. आम्ही दोघंच असे इकडचे तिकडचे यापूर्वी कधीच बोलत बसलो नव्हतो. अभ्यासातले काही विचारायचे असले तरी त्यांच्या हातात पुस्तक देऊन कोचावर त्यांच्या शेजारी न बसता वळसा घालून मी कोचाच्या मागे जाऊन उभा राहायचो. टेबलावर पाय टाकून मी वाचत बसलेलो असताना ते आले की, मी धडपडत पाय खाली घ्यायचो. हे मी माझ्या मुलांना सांगू का? नको, उगीच फिदीफिदी हसायची. टी.व्ही. बघत जेवायचं नाही असा घरात माझा दंडक होता. तो धुडकावून लावून माझी मुलगी सर्रास टी.व्ही.पुढे बसूनच जेवायची. तेल लावत गेला माझा दंडक. माझा मान राखण्यासाठी मग मीच माझा दंडक मागे घेतला. अण्णा असते तर त्यांना गंमत वाटली असती. ते म्हणाले असते, ‘‘मिस्टर शिरीष, तुम्हाला कोणी विचारत नाही. कहर आहे बाबा!’’

‘अन्नेसेसरी बॉदरेशन’ (पक्षी ः नसती कटकट) व ‘कहर आहे बाबा’ हे त्यांचे दोन लाडके शब्दप्रयोग होते. त्यातली ‘नसती कटकट’ माझ्या रूपानं घरातच होती. आलिशान, हवेशीर बंगल्यातही त्यांना गुदमरून टाकायला मी समर्थ होतो. त्यांचं व्यावसायिक यश व ऐहिक सुख यांच्यामध्ये मी भिंतीसारखा उभा होतो. सूर्यापोटी शनैश्वर जन्मला होता. माझ्या दृष्टीनं माझ्या जागी मी बरोबर असेनही, माझं बालमन होरपळलं असेलही, माझा उदेक समर्थनीय असलेही, माझ्या दुभंगलेल्या मनोवस्थेचं कारण योग्य असेलही, पण आपल्या वागण्यामुळे जगातील आपणास सर्वात प्रिय असलेल्या व्यक्तीस अपरिमित क्लेश होतायत हे भान मी नाही तर कोणी ठेवायचं? त्यात मी पूर्ण अपेशी ठरलो. माझ्या पलीकडे मी बघूच शकलो नाही. आजही बघू शकत नाही. त्यावर मी हुशारीनं म्हणतो, ‘‘माझ्याकडे मी नाही बघणार तर केण बघणार? मी-मी-मी…’’ ‘अन्नेसेसरी बॉदरेशन’ व ‘कहर आहे बाबा’ हे दोन्ही शब्दप्रयोग अण्णांना इथे वापरता आले असते. अण्णांना काय वाटलं असतं, अण्णा काय म्हणाले असते हे ते गेल्यावर त्रेपन्न वर्षांनीही मला सतावत असेल तर ते असताना माझी अक्कल कुठं गहाण पडली होती? मला कसला कैफ चढला होता? कसला माज आला होता? उतरला ना सगळा माज आता? माझ्या पश्चातही मागे राहिलेल्यांना माझ्यासाठी असंच भरून येईल का? कोण जाणे, बहुतेक नाही. कारण मी अण्णा नाही. अण्णांच्या जागी स्वतःला बसवू शकत नाही. ती योग्यता कुठून आणू? तो माणूस कुठून आणू? ती ‘अदा’ कुठून आणू? ‘जिसे तू कबूल कर ले वो अदा कहाँ से लाऊँ…’

एखादा भाबडा वाचक मला भाऊक होत विचारतो, ‘‘तुमचे वडील असते तर त्यांना तुमचा खूप अभिमान वाटला असता, नाही का?’’

मी ओठ आवळून म्हणतो, ‘‘माहीत नाही. मला त्यांचा अभिमान होता व आजही आहे एवढंच मी जाणतो.’’

अण्णांच्या आयुष्याच्या मार्गात विषारी काटे पसरणे एवढेच ते असेपर्यंत माझे जीवितकार्य होतं काय? खरं म्हणजे आपण काटे पसरतोय हे मला कळतच नव्हतं. दिसत होतं आणि दिसत नव्हतंही. यालाच डोळे असून आंधळा म्हणतात.

साधा परीक्षेचा फॉर्म मिळविण्यातही मी अपयशी ठरलो. माझ्या या लाजिरवाण्या नालायकीमुळे अण्णा कधी नाही ते उद्विग्न व प्रक्षुब्ध झाले होते. संतापाच्या भरात ते बोलून गेले, ‘त्याची आई असती तर तिने त्याच्या दोन थोबाडीत मारल्या असत्या.’

खाली गेलेली मान उचलून मी त्यांच्या डोळय़ाला डोळा दिला. अरे वा, यानिमित्तानं का होईना, तुम्हाला आई आठवली तर! माझी मान आपसूक पुन्हा खाली गेली. तीच तिची जागा होती. आईच्या उल्लेखानं मी क्षणभर माझी लायकी विसरलो होतो. अण्णांच्या तोंडून आईचं नाव आल्याचा हा पहिला व एकमेव प्रसंग. आता वाटतं, मी अण्णांना आईविषयी सगळं काही विचारून घ्यायला हवं होतं. आई कशी होती? कशी बोलायची? तिला काय आवडायचं? दुसरं कोण सांगणार होतं? पण त्यांच्याशी साधं साधं बोलायला माझी जीभ चाचरायची; तर मग त्यांच्या जखमेवरची खपली मी कशी उचकटणार होतो? आई आमच्यातील समान दुवा होती आणि या समान दुव्याविषयी आम्ही एकमेकांशी कधी चकार शब्दही बोललो नाही. त्यांच्या मनात काय होतं कोण जाणे! माझ्या मनात काय होतं, कोणी विचारायची तसदीच घेतली नाही. अण्णांना त्यांच्या फुललेल्या दुसऱया संसाराचा धाक असू शकेल का..? बिचारे सुखाच्या शोधार्थ वणवण फिरले, पण मी दुःखाचा डोंगर बनून त्यांच्या वाटेत पाय रोवून उभा होतो. मला विचारून दुसरं लग्न केलं होतंत? भोगा आता आपल्या कर्माची फळे…

…जे.जे.ला अण्णांना भेटून (पण काहीही न बोलता) मी बाहेर पडलो. अण्णांना असं निक्रिय, निवांत पहुडलेलं मी कधीच पाहिलेलं नव्हतं. म्हणूनच असेल कदाचित, माझे डोळे परत परत भरून येत होतं. ‘कॉरिडॉर’मध्ये समोरून अण्णांच्या जुन्या परिचयाची म्हातारी सिस्टर येत होती. तिला माझे डबडबलेले डोळे दिसू नयेत म्हणून मी ओंजळीतल्या मोगऱयाच्या फुलात तोंड लपवलं.

‘‘एवढी फुलं आवडतात तर मुलगी व्हायला हवं होतंस,’’ ती हसत हसत म्हणाली. मीही भिजल्या डोळय़ांनी हसलो.

त्यानंतर दोनच दिवसांनी माझ्यावर धाय मोकलून रडायची वेळ आली. 15 मार्च 1966 पासून मी अनाथ आहे. घोट घोट विष पितोय. पुरवून पुरवून.

जहर का भी अपना हिसाब है
मरने के लिये थोडा सा और
जीने के लिये बहोत सारा पीना पडता है

[email protected]