हरवलेलं संगीत (भाग 4) : सारी सारी रात तेरी याद सताये

602

>> शिरीष कणेकर

दत्ता कोरगावकर ऊर्फ के.दत्ता (‘दिया जलाकर आप बुझाया’ फेम) मला एकदा सांगत होते – ‘तो काळ फार वेगळा होता. आम्ही कोणाच्याही रेकॉर्डिंग रूममध्ये खुशाल घुसायचो आणि ऑकेस्ट्रा ‘कंडक्ट’ करायला लागायचो. आम्ही संगीतकार असूनही स्वखुशीत ‘अरेंजर’ची भूमिका करण्यात आम्हाला कसला कमीपणा वाटायचा नाही की आपल्या कामात हा नाक खुपसतोय असं त्या संगीतकारालाही वाटायचं नाही. सगळा दोस्ताना होता, खेळीमेळीचा कारभार होता. एखाद्यानं एखाद्या रागात मस्त बंदिश बांधली की त्याची पाठ थोपटत आम्ही म्हणायचो- थांब लेका, याच रागात तुझ्याहून भारी चीज मी बनवून दाखवतो. लावतो पैज? तो हसतहसत पैज स्वीकारायचा. गेले ते दिवस. मग एकमेकांच्या पाठीत सुरा खुपसण्याचे दिवस आले. त्याला स्पर्धा हे नाव देण्यात आले…’

कोरगावकर म्हणत होते त्या काळात रोशन सहज एस. डी. बर्मनच्या ‘नौजवान’मधल्या लताच्या ‘ठंडी हवाएं’च्या रेकॉर्डिंगला डोकावला. त्याला उगीचच वाटून गेलं की गाण्याची सुरुवात लताच्या एका तानेनं व्हायला हवी. तिथल्या तिथं त्यानं ती तान ‘कंपोझ’ केली. एस. डी.ने ती स्वीकारली व लतानं ती गायली. ‘ठंडी हवाएं’ इतकीच ती आधीची तान गाजली. हे सौहार्द, ही दोस्ती, हा याराना…

रोशननं ‘ममता’साठी एक अप्रतिम गाणं तयार केलं- ‘रहे ना रहे हम.’ त्यानंतर तो एस. डी.च्या ‘जेट’ या बंगल्यावर गेला व त्याला म्हणाला, ‘दादा, तुमच्या ‘ठंडी हवाएं’ची थोडी मोडतोड करून मी माझं गाणं बनवलंय. क्षमा असावी.’

वास्तविक अनिल विश्वास, मदनमोहन, सी. रामचंद्र यांच्या पंक्तीत मानाचं स्थान मिळायला हवं असं रोशनचं काम होतं. ‘बावरे नैन’, ‘हमलोग’, नौबहार’, ‘अजी बस शुक्रिया’, ‘बरसातकी रात’, ‘आरती’, दिलही तो है’, ‘ताजमहाल’, ‘भीगी रात’, ‘देवर’, ‘ममता’ यासारखे सुपरहिट म्युझिकल चित्रपट मिळाल्यानंतरही रोशन उपेक्षितच राहिला. ‘दर्दे दिल तू ही बता’ (‘जशन’) हे रोशनचे गाणे लताच्या सर्वोत्कृष्ट, पन्नास गाण्यात येईल. लता ‘भैरवी’ नावाचा चित्रपट काढणार होती. त्याचं संगीत सगळे सोडून तिनं रोशनकडे सोपवलं होतं. यात सगळं आलं. तो चित्रपट निघालाच नाही हेही रोशनच्या नशिबाला साजेसच होतं. वरळीला निर्माता हरी वालियाच्या घरी रोशन कशावरून तरी हसता हसता कोसळला व गेला. मला वाटतं नियतीला त्यानं शेवटचं एकदा हसून घेतलं.

रोशनपेक्षाही नशीबात खूपच मार खाल्लेल्या, पण उल्लेख न केलेल्या काही अल्पज्ञात संगीतकारांवर ओझरता कटाक्ष-
z जमाल सेन – ‘सपना बन साजन आये’ (‘शोखियाँ’- लता मंगेशकर)
z राम गांगुली – ‘आज मोरा मन बीन बजाये’ (‘गवैया’ – तलत महेमूद)
z मनोहर (खन्ना) – ‘राह न सूझे जाऊ कहाँ’ (‘चिंगारी’ – लता मंगेशकर)
z पं. अमरनाथ – ‘कहीयो रोये दुखियारे’ (‘गरम कोट’ – लता मंगेशकर)
z ए. आर. कुरेशी – ‘तुमको फुरसद हो मेरी जाँ’ (‘बेवफा’ – तलत महेमूद)
z पं. गोविंदराम – ‘तेरा खयाल दिलको सताये’ (‘नकाब’ – तलत महेमूद)
z मुकुल रॉय – ‘है ये दुनिया कौनसी’ (‘सैलाब’ – हेमंतकुमार)
z रामलाल – ‘गीत गाया पत्थरोंने’ (‘गीत गाया पत्थरोंने’ – किशोरी अमोणकर)
z व्ही. बलसारा – ‘सुनावू हाले दिल क्या’ (‘मदमस्त’ – लता मंगेशकर)
z शार्दुल ख्वाजा – ‘जब तुमही हमे बरबाद करो’ (‘पिलपिली साहब’ – लता मंगेशकर)
z एस. के. पाल – ‘कठिन बिरहाकी पीर’ (‘ढोलामारू’ – लता मंगेशकर)
z एस. मोहिंदर – ‘लगत लगी सजत मिलन की’ (‘नाता’ – लता मंगेशकर)
z अविनाश व्यास – ‘झूलो झूलो रे’ (‘एकादशी’ – लता मंगेशकर)
z चिक् चॉकलेट – ‘अच्छा होता जो तू’ (‘नादान’ – लता मंगेशकर)
z एस. डी. बातिश – ‘ख्वाबमे हमको बुलाते हो’ (‘तुफान’ – लता मंगेशकर)
z अरुणकुमार मुखर्जी – ‘गोरे गोरे हाथों मे’ (‘परिणीता’ – आशा भोसले व कोरस)
z शिवराम कृष्ण – ‘अपनी अदापे मे हूं फि2दा’ (‘तीन बत्ती चार रास्ता’ – लता)
z धनीराम – ‘आँखो से दूर’ (‘धुआँ’ – लता मंगेशकर)
z नाशाद – ‘तसवीर बनाता हूँ’ (‘बारादरी’ – तलत महेमूद)
z ज्ञानदत्त – ‘मैने देखी जगकी रीत’ (‘सुनहरे दिन’ – शमशाद-मुकेश)
z दत्ताराम – ‘मस्ती भरा है समाँ’ (‘परवरीश’ – लता व मन्ना डे)

आपली प्रतिक्रिया द्या