स्वप्नवत टास्मानिया

>> द्वारकानाथ संझगिरी

सध्या मी ऑस्ट्रेलियात आहे. अलीकडे ही माझी तिथली वार्षिक सहल असते. मुलांना भेटतो, नातीला भेटतो. येताना बॅगेत फक्त आनंदी आठवणी असतात. त्यावर वर्ष निघतं.

दुसऱयांदा मी ख्रिसमसच्या वेळी ऑस्ट्रेलियात आहे. ख्रिसमस म्हणजे नाताळ. नाताळापूर्वी इथलं वातावरण आपल्या दिवाळीसारखं असतं. म्हणजे दिव्यांची रोषणाई, काही बंगले अफलातून सुंदर सजवलेले वगैरे! इथेही त्यासाठी चिनी बनावटीच्या माळा मिळतात. फक्त जी कलाकुसर केलेली असते त्यात येसू, येसूचा जन्म, तो गोठा, ती चांदणी, तो सांताक्लॉज यांची कहाणी गुंफलेली असते. आपल्याप्रमाणे फटाके नसतात, ‘पर्यावरणाशी प्रतारणा करू नका’ वगैरे सरकारी जाहिराती नसतात. कारण शिस्त इथल्या (खरं तर पहिल्या जगात कुठेही) अंगात मुरलीय. नाताळापूर्वीच्या दोन उत्सवांना मी गेलो होतो. एक ऍडलेडच्या डाऊनटाऊनच्या (आपल्या फोर्टसारख्या विभागाला दिलेलं नाव) व्हिक्टोरिया स्क्वेअरला! तिथे एक रंगीबेरंगी ख्रिसमस ‘ट्री’ उभारला होता. बाजूला छोटेखानी जत्रा होती. दुसरा उत्सव हॅन्डॉर्फ या ऍडलेडपासून अर्ध्या तासावर असलेल्या जर्मन गावात होता. एक छोटं स्टेज, स्टेजवर गाणं, सांताक्लॉजचं रूप घेऊन फिरून मुलांचं मनोरंजन करणारी माणसं वगैरे वगैरे! दोन्ही ठिकाणी भरपूर खाण्याचे स्टॉल्स होते. बरंचसं टिपिकल युरोपियन खाणं, काही एशियन खाण्याचे स्टॉल्स. बिअर, वाइन वगैरे! हॅन्डॉर्फला मी उत्साहात वाईन घ्यायला गेलो तर ती वासानेच चढली. ती टिपिकल वायनरीमधून आलेली रक्त (रेड) किंवा श्वेत (व्हाईट) वारुणी नव्हती. ती खास नाताळसाठी तयार केलेली होती. मुख्य वाइन ग्लासाऐवजी मोठय़ा बिअरच्या मगमधून दिली जात होती. त्या मगचा जाडजूड आकार, वाइनचा वास यामुळे मी मागे फिरलो आणि नंतर गावात एका रमणीय रेस्टॉरंटमध्ये अस्सल नाचणारी (स्पार्कलिंग) वारुणी एका मार्गारेट पिझ्झाच्या तुकडय़ाबरोबर घेतली, पण दोन्ही ठिकाणी एक गोष्ट मला जाणवली. खाण्याचे स्टॉल्स असून एखादा कागदाचा तुकडा, पेपरग्लास किंवा काहीही गवतावर सांडलेलं किंवा पडलेलं नव्हतं. कुटुंबेच्या कुटुंबे जेवत होती, पण घाणीला किंवा अस्वच्छतेला चोरपावलानेही प्रवेश नव्हता. प्रत्येक जण आपलं खाणं झालं की, ‘लिटर’च्या पिंपात सर्व वस्तू टाकत होता आणि त्या स्वच्छतेसाठी ‘स्वच्छ ऑस्ट्रेलिया’ टॅक्सही भरत नव्हता. गोऱ्या देशात स्वच्छता शिकवण्यासाठी एखाद्या गाडगे महाराज, महात्मा गांधी किंवा सेनापती बापटांनी जन्म घेतला की नाही मला ठाऊक नाही. त्यांनी आपल्याला स्वच्छता शिकवताना फक्त फोटोसाठी तोंडाला फडकं गुंडाळून स्वच्छता शिकवली नाही. त्यांनी हातात झाडू स्वच्छतेचं नेतृत्व करण्यासाठी घेतली. तरी त्यांच्या अनुयायांनाही ही मोहीम पुढे घेऊन जावीशी वाटली नाही. युरोपियन देश, विशेषतः इंग्लंडमध्ये मोठय़ा शहरांत अस्वच्छता वाढलीय त्याला काही प्रमाणात तिथे वाढलेले ‘इमिग्रण्ट्स’ जबाबदार आहेत. वैयक्तिक स्वच्छता जेवढी आपल्या अंगात मुरली आहे तेवढी सार्वजनिक स्वच्छता नाही. युरोपात किंवा गोऱया देशात कुठेही जा, साधं ‘बेड ऍण्ड ब्रेकफास्ट’चं घरटं म्हणा, हॉटेल म्हणा, किती सुंदर सजवलेलं असतं. किती स्वच्छता, देखणं असतं. मला एक माझा जुना किस्सा आठवतो. मी स्वित्झर्लंडमध्ये फिरत होतो. मी एक कोक घेतला आणि तो कॅन उघडला. त्याचा तो बदामाएवढा जो पत्र्याचा भाग असतो, तो नकळत माझ्या हातून फुटपाथवर फेकला गेला. माझ्या मागून येणाऱया गोऱया माणसाने तो उचलला, मला दाखवला आणि माझ्यासमोर काही अंतरावर असणाऱया कचरापेटीत टाकला. जाताना तो मला म्हणाला, ‘‘माझं शहर स्वच्छ आहे, ते स्वच्छच राहू दे.’’ त्याचे शब्द सर्पदंशासारखे मला डसले, पण हे ‘विष’ काही काळ अंगात भिनलं, पण नंतर रक्तात मिसळून जुन्या रक्ताचा भागच बनलं. परवा ऍडलेडच्या सेंट्रल मार्केटमध्ये आम्ही फिरत होतो. हे तिथलं क्रॉफर्ड मार्केट असं म्हणायला हरकत नाही. मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटचा परिसर दिवाळीत जसा उत्साहाने, भेटवस्तूंनी, विकायला ठेवलेल्या विविध वस्तूंनी वाहत असतो तसा वाहत होता. तिथे बिअर, वाइन टेस्टिंग, पोर्क, बीफ, चीज टेस्टिंगचीही सोय होती. सर्वत्र गर्दीच गर्दी! आम्हाला ऑलिव्हज् दिसले. मला फार आवडतात! वर ते ‘हेल्थ फूड’ या सदरात येतात. मी एक खाल्ला. माझ्या नातीने खाल्ला. तिला जी ‘बी’ लागली ती तिने जिवाचा आटापिटा करीत कचरापेटी शोधून त्याच्यात टाकली. तोंडातली ‘बी’ माझ्या हातून कधी जमिनीवर पडली मला कळलंच नाही. माझ्या नातीने जेव्हा एक ‘बी’ टाकण्यासाठी आटापिटा केला तेव्हा हातातून पडलेल्या ‘बी’ची मला आठवण झाली. आमचं एकच रक्त, मग असं का? तिला तिथे तिच्या शाळेत या गोष्टी शिकवतात आणि अंगात भिनवून घेतात. झेब्रा क्रॉसिंग दिसल्याशिवाय ती क्रॉस करीत नाही. मी केला तर मला मी चुकतोय याची जाणीव करून देते. आता ती पहिलीतून दुसरीत गेली, पण या गोष्टी तिला शाळेत शिकवून झाल्या आहेत. नाताळापूर्वीची उत्साही गर्दी किती स्वच्छ राहू शकते याचं उदाहरण तिथे मिळतं. गर्दी जमली की, अस्वच्छता होणारच अशी गृहितं ते मांडत नाहीत.

पण नाताळापूर्वीचा झगमगाट, तो शॉपिंग सेंटरमधून वाहणारा, खरं तर ओसंडून वाहणारा उत्साह २५ डिसेंबरला बर्फासारखा थंडगार होतो. नाताळसाठी आम्ही (मी, मुलं, बायको, नात) ऑस्ट्रेलियात टास्मानियात आलोय. टास्मानिया हा ऑस्ट्रेलिया या मूळ खंडापासून हाकेच्या अंतरावर असणारा बेटांचा समूह! क्रिकेटप्रेमींना समजावून सांगायचं तर डेव्हिड बून आणि रिकी पॉन्टिंगचा प्रांत. होबार्टपासून पंचविसेक किलोमीटरवरच्या एका टुमदार गावात आम्ही राहतोय. होबार्ट ही टास्मानियाची राजधानी आणि प्रमुख शहर! गाडी भाडय़ाने घेऊन भटकतोय. नाताळच्या दिवशी हाल झाले. सर्व बंद! काही पेट्रोल पंप आणि त्यावर असणारं दुकान सोडलं तर चोवीस तास चालणारं मॅकडोनाल्डही बंद! आपल्याकडे दिवाळीत चार दिवस हॉटेल्स, शॉपिंग सेंटर्स पूर आलेल्या ब्रह्मपुत्रा नदीसारखी वाहत असतात. इथे सर्वजण आपापल्या घरी मुलाबाळांसह नाताळ एन्जॉय करतात. मुळात तिथे मुलं विशीच्या आसपास वेगळं घरटं बनवतात. मुलं-मुली, आई-बाबा, आजी-आजोबा हे वेगवेगळे राहतात. त्यात सावत्र नाती खूप असतात. नाताळ हे सांस्कृतिकदृष्टय़ा एकत्र यायचं एक निमित्त असतं. फक्त उघडं काय होतं? पब आणि दारूची दुकानं, ज्याला इथे ‘बॉटल स्टोअर’ असं म्हटलं जातं. पबमध्ये फिश ऍण्ड चिप्स मिळतील म्हणून शिरलो तर त्यानं सांगितलं, ‘‘फक्त मद्य मिळेल, खाणं नाही.’’ ते २७ तारखेपासून! तरीही काही मंडळी सकाळी ११ च्या सुमारास मद्य घेऊन नाताळ साजरा करीत होती. आम्ही ‘गरुडा’च्या नजरेतून दिसणारं होबार्ट शहर पाहायला माऊंट वेलिंग्टनवर गेलो. गर्दी होती, पण ते सर्व पर्यटक आहेत हे कळत होतं. तेही हिंदुस्थानी, चिनी, जपानी जास्त! काही गोरी मंडळी सहकुटुंब डोंगरमाथ्यावर घरून आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेत होतं. कुणी म्हणालं, ‘‘किंग्स्टनला जा, तिथे एखाद्दोन हॉटेल्स उघडी मिळतील.’’ किंग्स्टन हे होबार्टचं श्रीमंत उपनगर म्हणायला हरकत नाही. शहरात असा सन्नाटा होता की वाटावं, मार्शल लॉ लावून कर्फ्यू लावलाय. आम्ही किंग्स्टनच्या चौपाटीवर गेलो. पार्किंगची जागा भकास! बीचवर तुरळक माणसं होती. आमचं लक्ष सहज स्विमसूटमध्ये बसलेल्या एका जाडजूड बाईकडे गेलं. ती एकटीच बसली होती. तिची माझ्या नातीएवढी लहान मुलगी आधी पाण्यात, मग वाळूत खेळली. आमच्या अंगावर कोट होता. गोऱयांना थंडी वाजत नाही का? हा प्रश्न मला पडला तेव्हा एक चालणारं जोडपं थांबलं. त्या बाईकडे गेलं. ती बाई हमसून हमसून रडायला लागली. मग मला जाणवलं, नाताळ साजरा करायला तिला मुलगी सोडून कुणी नसावं. नवरा, मित्र, भाऊ, वडील वगैरे कुणीही. नाहीतर ती का एकटी बसली असती? अचानक हृदयात कालवाकालव झाली. नाताळ तिच्यासाठी क्रूर झाला होता. उगाच मनात अनेक प्रश्न उभे राहिले. माझ्या नातीप्रमाणे त्या मुलीच्या उशाशी आई सांताक्लॉज बनून तिची आवडती खेळणी ठेवून गेली असेल का? तिने घराला रोषणाई केली असेल का? खरं सांगू, माझी भूक गेली. ती एकाकी बाई आणि तिच्या मुलीबद्दल मी विचार करू लागलो. मी माझ्या सुनेला म्हटलं, ‘‘आपण तिच्याशी बोलूया का? कदाचित मायेचे चार शब्द तिच्या जखमांवर फुंकर मारतील. एकाकीपण हीच तिची जखम असावी.’’ माझी सून म्हणाली, ‘‘नको बाबा, त्यांच्या संस्कृतीशी आमची अजून नीट ओळख झालेली नाही. तिला हे आवडेल न आवडेल? इथे प्रायव्हसी फार महत्त्वाची असते.’’ खरंय, आपण अस्वच्छ असू, गरीब असू, पण माणुसकी, कौटुंबिक जिव्हाळा अजूनही आपल्यात आहे. आपली आई ही ‘श्यामच्या आई’सारखी मुलाला जखम झाल्यावर विव्हळणारी आई आहे. काही अपवाद सोडा, पण मोठय़ा प्रमाणात आपले वृद्ध आईवडील आपल्या घरात राहतात. येस्, अजून आपण मनाची स्वच्छता सोडलेली नाही. हा नाताळ मला हे शिकवून गेला.

– [email protected]