रेसिपी

>> शिरीष कणेकर

खुसखुशीत, कुरकुरीत व खमंग कसे लिहितात?

मी रेसिपी सांगतो. ही घ्या. रेघांच्या पांढऱ्या कागदावर मजकूर पाडा (बुंदी पाडतात तसा किंवा पायात पाय घालून पाडतात तसा!). अक्षर वाचता आलं नाही तर उत्तम. तुम्हाला तव्यावर उडणाऱ्या निवटयांस्वरूप लेखन करायचंय, सुलेखन नव्हे. इन अदर वर्डस् तुम्हाला अच्युत गोडबोले व्हायचंय, अच्युत पालव नव्हे. ओके? या कागदाच्या नीटस घड्या घालून त्याचे एक चौरस इंचाचे तुकडे पाडावेत (नात्यांचे आपण पाडतो तसे). कढईत तेल गरम करून त्यात हे तुकडे अलगद सोडावेत (चंद्राच्या व प्रेयसीच्या साक्षीनं तळय़ात पाय सोडावेत तसे). कढईत वरून (कारण खालून शक्य नाही.) लसूण, हिंग, मिरे (डोक्यावर वाटतात ते!), जिरे, मिरच्या, मीठ (स्वादापुरते), तिखट (मूळव्याधीपुरते), हळद (फक्त सांगलीची!), ज्येष्ठीमध (फक्त श्रीलंकेतली!), अजिनोमोटो (म्हणजे काय कळलं नाही तरी – चिमूटभर), बदाम – काजू – पिस्ता वाटून, खारीक, जरदाळू, आलं (घातलं नाही असं वाटू नये म्हणून घालायचं इतकंच), नागपुरी सावजीचा तिखट मसाला (पदार्थाच्या चवीचा तोल बिघडवण्यापुरता), प्रत्येक कागदाच्या तुकड्यावर मोजून तीन थेंब ‘रेड वाइन’, दोन चमचे गुलकंद, चण्याचं पीठ, शंभर ग्रॅम शिजवलेला खिमा, काटा काढलेले बोंबिल, दुधाचं सायटं… झालं? आता मोठे बटाटे (पॅटिससाठी आणतो तसे) उकडून घ्या. त्यांची सालं काढा. त्यानंतर सुरीनं शहाळ्यातलं खोबरं काढतात त्याप्रमाणे हे उकडलेले बटाटे आतून पोखरा. इकडे कढईतला माल पाट्यावर वाटून त्याचा लगदा तयार करा. हा लगदा लहान मुलाला भरवतात त्याप्रमाणे पोखरलेल्या बटाटयात ठासून भरा. उथळ तेलात तो परता. वारंवार उलटापालटा करीत रहा; अन्यथा तो करपून जाईल. लेखन खुसखुशीत, कुरकुरीत व खमंग होण्याऐवजी ते जयप्रकाश नारायणांच्या भाषणांप्रमाणे रुक्ष, भरताड व कंटाळवाणे होईल.

एवढी तपशीलवार रेसिपी दिल्यानंतरही कोणी त्या वाटेला जाईल असं मला वाटत नाही. कोण घेणार एवढे कष्ट? तुमच्या नशिबी रटाळ काहीतरी वाचणं असेल तर त्याला कोण काय करणार?

अरे हो, सांगायचंच राहिलं. ‘पोटॅटो रोल’सारखा दिसणारा पण चटपटीत लेखनाचं गुपित ठासून भरलेला हा पदार्थ वर कोथिंबीर शिंपडून खजुराची चटणी किंवा ‘मेयॉनीज’, ‘सॉस’ किंवा ‘टॉमॅटो केचप’ किंवा पुदिन्याची चटणी यांच्यासमवेत पोटभर खावा. त्यानंतर येणारा ढेकरदेखील खुसखुशीत, कुरकुरीत व खमंगच असणार. आत गेलेले तुमचे पुचाट शब्द लेखणीवाटे बाहेर पडताना साहित्याची भरजरी, जरतारी राजवस्त्र परिधान करूनच बाहेर पडतील…

आजकाल, सेल्फी, व्हॉटस् ऍप व रेसिपी या तीन गोष्टींनी अवघा देश खुळावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदीही जरा वेळ मिळाला की, अमित शहांना भारी भारी रेसिपी सांगतात. त्या रेसिपींना ‘नीच’ म्हटलं तर आपण पक्षातून हमेशा के लिये निलंबित होऊ का, या विचारानं मणिशंकर अय्यर धास्तावलेत. ‘‘आई, तू दुपारी खायला करायचीस तो पदार्थ सांग ना’’ असा राहुल सोनियाजींकडे हट्ट धरून बसतो. ती गुळ-पोळी होती हे त्यांनी कितीही हिंदी, इंग्लिश व इटालियन भाषेत सांगितलं तरी पक्षाध्यक्ष राहुलजींना खरं वाटत नाही. आता तो एन. डी. तिवारी, दिग्विजय सिंग व अंबिका सोनी या पक्षात असून नसल्यासारख्या असलेल्या पिकल्या पानांना आठवतोय का बघणार आहे.

वृत्तपत्रे, टी.व्ही. व कॉम्प्युटर बघावं तिकडं या रेसिपींनी धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतो. माझ्या माहितीतली एक प्रौढ कुमारी रात्रंदिवस या रेसिपींच्या गुऱहाळात रमलेली दिसते. प्रत्यक्षात तिनं कधी भात-भाजी केल्याचं ऐकिवात नाही. अशी माणसं पुढे ‘ऑब्झर्व्हर’ म्हणून पक्षीय राजकारणात नाव कमावतात. उचलेगिरीनं सुरुवात करणारे पुढे दरोडेखोर होतात, त्याप्रमाणे.

आमचे प्रशांत दामले व संकर्षण कऱहाडे टीव्हीवर पाकस्पर्धा घेतात. गृहिणीला पदार्थ करायला लावायचा, मग तो ताजा ताजा चाखायचा व त्यानंतर ‘‘ओ हो हो’’ असे तोंडातून चित्रविचित्र आवाज काढण्याचा बेमालूम अभिनय करायचा. थोडक्यात, ही पाकस्पर्धा नसून अभिनय स्पर्धा असते. दामले – कऱहाडे जोडी प्रेक्षकांना थुंक लावते. ते बिचारे त्यांचा व्यवसाय करतात. म्हणजे थुंक लावणे नव्हे, तर अभिनय करणे.

आमच्या प्रधानांची लेक (लाडकी या घरची!) एक्सपर्ट ‘शेफ’ आहे. खिमा पॅटिस ही तिची स्पेशॅलिटी (आमचीही – खाण्याची!). टीव्हीवर तिनं तिचा खिमा पॅटिस दाखवला. त्यात लसूण व आलं घातलेलं होतं. त्यामुळे पॅटिसला येणारी चव आम्हाला रुचत नाही, पण ती पडली एक्सपर्ट. त्यातून आमच्या (‘अगर होते सभी अपने तो बेगाने कहाँ जाते?’ इति शकील बदायुनी. त्यांना पॅटिसमध्ये लसूण व आलं चालत असेल का? नसावं. नाहीतर ‘सभी पॅटिस मे आलं-लसूण खाते, तो कणेकर कहाँ जाते?’ असं त्यांनी लिहिलं नसतं का?…) आमच्या प्रधानबाईंची ती मुलगी. तोंड दाब के बुक्के का मार! आपलं मत पायानं जाजमाच्या खाली ढकलून गप्प बसावं झालं.

घरोघरी बायका आसूसून या रेसिपी टीव्हीवर व कॉम्प्युटरवर डोळ्यांची पापणी न लववता बघत असतात (तो पेपरात वाचण्याचा त्रासही नको बाई!). त्यातल्या किती जणी या रेसिपी घरी ट्राय करत असतील मला शंका आहे (नवऱयाचा छळवाद म्हणून तरी करा, आता हा अँगल कळल्यावर नक्की करतील).

जेवताना ताटातल्या भाजीकडे बोट दाखवून नवऱ्यानं विचारलं, ‘‘काय नाव या भाजीचं?’’

‘‘एवढी आवडली का?’’ बायको सुखावून म्हणाली, ‘‘आणखी वाढू?’’

‘‘नाही-नाही.’’ नवरा घाईघाईनं म्हणाला, ‘‘वर गेल्यावर मला विचारतील ना, की काय खाऊन वर आलास. मला भाजीचं नाव सांगावं लागेल.’’

कॉम्प्युटर – टीव्हीवर बघून रेसिपी करायला कोणी माता-भगिनी धजावल्या आणि देव न करो पण ती ‘डिश’ बिघडली तर घरात तांडव होतं. तळमजल्यावरचे भांडायला येतात. ती रेसिपी सांगणाऱ्यांचे (किंवा सांगणारीचे) पितर उद्धरले जातात. आपण कुठेतरी चुकलो असू ही शक्यताच विचारात घेतली जात नाही. ‘कोणालाही बोलावतात. ज्यांना येतं त्यांना बोलवत नाहीत (म्हणजे हिला हं!)… रेसिपीजमुळे घरोघरी वेगवेगळय़ा पदार्थांची चंगळ उडेल अशी या रेसिपीवाल्यांची अपेक्षा असेल तर ती पूर्णपणे फोल ठरल्येय. या रेसिपींमुळे घराघरातून स्वयंपाकघरात धुराप्रमाणे उद्वेग दाटतो, त्रागा वाढतोय, तोंडं वाजतायत. बायका एकमेकांना फोन करून तणतणतायत – ‘‘बघितलं ना काय? यांच्या बापानं कधी बिर्याणी अशी केली होती का? कांदाच नाही? काय डोकी आहेत की काय आहेत?…’’

माझी खुमासदार, टेसदार, स्टाइलबाज लेखनाची रेसिपी वाचून कोणी इच्छुक लेखक संतापून म्हणेल, ‘‘बक्वास आहे सगळी. दुधाचं सायटं, खारीक, जरदाळू, गुलकंद घालून चमचमीत, कुरकुरीत, खमंग लेख बनतो वाटतं? नशीब वाडगाभर साखर घालायला नाही सांगितलं. उल्लू बनवण्याची लाइन. पण या बनचुक्यांना कोण सांगणार?…’’

– Shireesh.kanekar @gmail.com