चला, बसू या!

17

>> शिरीष कणेकर

परवा एक प्रकाशक भेटले होते. ते बोलता बोलता म्हणाले, ‘बसण्या बसण्यात माझ्या हातातून एक चांगलं पुस्तक गेलं.’

‘म्हणजे?’ काही न कळून मी विचारलं.

‘ते पुस्तक वास्तविक लेखकानं मला दिलं होतं.’ प्रकाशक म्हणाले. ‘त्यानंतर लेखक व दुसरे एक प्रकाशक ‘बसले’. त्या बैठकीत ते पुस्तक माझ्याकडून त्या प्रकाशकाकडे सरकले. मी उघडय़ा डोळय़ांनी बघत बसलो. म्हणून म्हटलं बसण्या बसण्यात माझ्या हातातून एक चांगलं पुस्तक गेलं.’

‘तुम्हीदेखील आता बसायला लागा’ मी हसत हसत म्हणालो, ‘बसल्या बसल्या लोळा आणि समोरच्यालाही लोळण घ्यायला लावा. धंद्याला बरकत येईल.’
‘बसू या’ या द्विशब्दी प्रयोगाला आता एक निश्चित अर्थ प्राप्त झालाय. नुसत्या निरुपद्रवी गप्पा मारायला बसूया हा शाकाहारी अर्थ केव्हाच मागे पडलाय. ‘बसूया’ म्हटल्यावर पुरुषांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. त्या क्षणापासूनच त्यांच्या गात्रात नशा भिनायला लागते. दारूच्या पुढे (खरं म्हणजे एकूणच) लग्नाची बायको कःपदार्थ, बायकोत ती नशा असती तर पुरुष भरकटले कशाला असते? कोणीतरी म्हटलंय ना, व्हरायटी इन द स्पाइस ऑफ लाइफ. मग साल्यांनो, आयुष्यभर एकाच ब्रॅण्डची कशी पिता? अन् बायकोचा लगेच कंटाळा येतो काय? तिलाही तुमचा कंटाळा आला तर झेपेल का तुम्हाला? बात करते है!

एकदा सुधाकर व तळीराम यांनी ठरवलं की आता दारू दारू बस्स झालं. दुनियेत आपली बेवडे म्हणून बदनामी झालीय. वी मस्ट डू समथिंग अबाऊट इट. ते काही नाही, दारू सोडायची, दोघं सहमत झाले. त्यांनी दारू सोडून आठवडा लोटला. त्यांचा हा दारू सोडण्याचा विक्रम होता. आठवडय़ानं सुधाकर तळीरामला म्हणाला, ‘मी काय म्हणतो, आपण आता दारू सोडलीच आहे. गेला आठवडा आपण दारूच्या थेंबालाही शिवलेलो नाही ही गोष्ट सेलीब्रेट करायला आपण थोडी घेतली तर तुझी काही हरकत आहे का?’

‘मी कधी घेतल्येय का?’ तळीरामनं विचारलं.

‘आँ?’

‘मी कधी पिण्याला हरकत घेतल्येय का?’ तळीरामानं आपली भूमिका स्पष्ट केली.

परवाच कुठेतरी एक विनोद वाचला. गांधी जयंती 2 ऑक्टोबरऐवजी 31 डिसेंबरला असती तर? माय गॉड, म्हणजे 31 डिसेंबर ‘ड्राय डे’?
एकेकाळी दारू ही चोरून पिण्याची गोष्ट होती. आता राजरोस कोणाच्याही छाताडावर पाय रोवून ढोसण्याची गोष्ट झाल्येय. (दूध कदाचित चोरून पीत असतील) कशी ते कळत नाही, पण दारूला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाल्येय. कोणी वेडाच असेल जो दारूशिवाय पार्टीचं आयोजन करील. माझा एक मदिराप्रेमी मित्र (मैत्रिणींनो सांगू नका नाव घ्यायला!’) खिशात ‘चपटी’ ठेवून लग्नाच्या रिसेप्शनला खुशाल पीत असतो. वर ‘कोणी बघत नाही’ असं म्हणतो.

एक दारूबंदी प्रचारक खेडय़ात भाषण देत असतो-

‘समजा एका गाढवापुढे एका बादलीत पाणी व एका बादलीत दारू ठेवली तर तो काय पिईल?’ त्यानं विचारलं,

‘पाणी’ एक खेडूत उत्तरला.

‘बरोबर पण का?’ प्रचारकानं विजयी सुरात विचारलं.

‘कारण ते गाढव आहे’. मागून दर्पयुक्त उत्तर आले.

‘दारू करी सर्व सुखाचा नाश’ अशी सरकारी घोषणा जागोजाग रंगवलेली असते. मग लग्नाविषयी अशी घोषणा का देत नाहीत? दारूमुळे होणाऱया संभाव्य दुष्परिणामांविषयी इतके जागरूक असणारे लग्नाविषयी इतके बेफिकीर कसे राहू शकतात? एक लक्षात ठेवा की लग्नामुळे आलेल्या वैफल्यावर मात करण्यासाठी दारू कामी येते. मात्र दारूमुळे आलेल्या वैफल्यावर मात करण्यासाठी लग्न (पक्षी-बायको) काहीच कामाला येत नाही. दारू उतरली की ब्रह्मांड (पक्षी-बायको) आठवते, बायको मनातून उतरली की दोन्ही हात पसरून गुत्ता स्वागत करतो.

आणखी एक विनोद

मी एकदा संगीतकार दत्ताराम (वाडकर) याला भेटायला गेलो होतो.

‘मी कधीच दारूच्या वाटय़ाला जायचो नाही’ आपला ग्लास भरत तो मला म्हणाला, ‘एकदा राज कपूरसाहेबांच्या आर. के. कॉटेजमध्ये आम्ही सगळे जमलो होतो. शंकर-जयकिशन होते, सगळे होते. म्युझिकचं सेशन चाललं होतं. मध्येच राज कपूरसाहेबांनी ग्लास भरून माझ्यापुढे धरला. त्यांना नाही कसं म्हणणार? मी घेतला.’

हे टायमिंग अचूक साधून दत्तारामने ग्लास उंचावला व तो म्हणाला, ‘चिअर्स’!

पूर्वी दरवर्षी पार्श्वगायन करणाऱयांची एक मीटिंग कोणा पार्श्वगायकाकडे व्हायची. एकदा ती मीटिंग लता मंगेशकरकडे होती. तिनं चोख व्यवस्था ठेवली होती. जेवण चालू असताना तिनं मुकेशला विचारलं, ‘मुकेशभय्या सब ठीक है ना?’

‘वैसे तो सब ठीक है लेकिन (अंगठा ओठाजवळ नेत) ये नहीं है तो चिकन कव्वे जैसा लगता है’ मुकेश म्हणाला.

नाटक सिनेमातल्या व बाहेरच्या अनेक मित्रांना मी तीव्र इच्छा असूनही घरी जेवायला बोलावू शकत नाही. कारण एकच माझ्याकडे ‘बसूया’ कल्चर नाही. म्हणजे त्यांना चिकन कावळय़ासारखं लागणार. त्यापेक्षा कावळाच घातलेला काय वाईट?

एक शायर म्हणतो-

‘पीता हूं इसलिए के जल जाए जवानी

वरना किसी शौक के लिए तो नहीं पीता’

दुसरा एक भामटा म्हणतो –

‘कौन कहेता है के मय में नशा हैं

गर मय में नशा होता तो बोतल ना नाचती?’

हा एक शेर वाचा-

तौहीन ना कर शराब को कडवा कर कर
जिंदगी के तजुर्बे शराब से भी कडवे होते है

[email protected]