शतकवीर!

>>द्वारकानाथ संझगिरी

देव हा ‘सत्यजित रे’च्या दर्जाचा दिग्दर्शक असावा. त्याने सुनील गावसकर नावाच्या ‘रेकॉर्डब्रेकर’ला दहा जुलैला जन्माला घातलं, तेसुद्धा मुंबईत! त्या दिवशी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असते. कालही कोसळत होताच की! देवाला सुचवायचं होतं, हा मुलगा धावांचा पाऊस पाडणार आहे.

आम्हा पामरांना ते कळलंच नाही. कारण तोपर्यंत आम्ही धावांचा पाऊस पाहिलाच नव्हता. कधीतरी उम्रीगर, विजय मांजरेकर, चंदू बोर्डे शतकं ठोकायचे आणि पुढे दोन महिने चर्चेला विषय मिळायचा. किती शतकं अशी माझ्या पिढीने चघळली आहेत! कदाचित सुनील गावसकरनेही लहानपणी चघळली असावीत. म्हणून सुनीलने हे थांबवायचं ठरवलं. त्याने पहिल्याच दौऱ्यात अशी शतकं ठोकली की, एक शतक पचायच्या आधी दुसऱ्या शतकाचा घास ताटात असायचा. पण अजीर्ण कधी झाले नाही. पोट भरल्यासारखेसुद्धा कधी वाटले नाही. पुढचा घास कधी ताटात पडतो याची आम्ही वाट पाहायचो.
काल, सुनीलच्या वाढदिवसाच्या दिवशी हे सर्व आठवलं आणि वाटलं सुनीलवर लिहावं. सुनीलबद्दलचं लिखाण माझ्या पेनातून बाहेर येत नाही. ते हृदयातून येते. भावनांची शाई होते आणि मन पेन बनतं. किती आनंद वाटला त्याने! आमच्या किती इच्छा, आकांक्षा त्याने पूर्ण केल्या!

लहानपणी क्रिकेटबद्दलचे लेख वाचताना वाटायचं, आमच्या अंगणात कधी सर जॅक हॉब्ज, सर लेन हटन निर्माण होणार? गेला बाजार, हनिफ महमद तरी? विजय मर्चंट, विजय हजारेतून तसा खेळाडू निर्माण झाला असता, पण त्यांना फार संधी नाही मिळाली. सुनीलने ती आमची इच्छा पूर्ण केली. आज, क्रिकेटच्या इतिहासातला जागतिक संघ काढायचा असेल तर आघाडीला पहिलं नाव सुनीलचं टाकलं जाईल. मग त्याच्या पार्टनरचा विचार होईल – जॅक हॉब्ज, हटन की आणि कुणी?

माझ्या लहानपणी वेगवान गोलंदाजीपासून कोण कसं पळालं याची चर्चा जास्त होई. सुनील आला आणि या चर्चा इतिहासजमा झाल्या. कारण जगातली, खरं तर इतिहासातली, सर्वश्रेष्ठ थरकाप उडविणारी गोलंदाजी गावसकर नावाच्या बुरुजाला खिंडार पाडू शकली नाही. त्यांना लक्षात आलं, आपण भिंतीवर डोकं आपटतोय. एक बुटका, डोक्यावर हेल्मेट न घालणारा माणूस एका लाकडी बॅटने त्यांना अजिंक्य बुरुजाचा ‘फिल’ देत होता. त्याच्या पहिल्या दौऱ्याची मी बॅट पाहिली होती. तांबडय़ा बॉलच्या रूपात पराक्रमाच्या फिती त्या बॅटच्या मध्यावर होत्या. एकच नखाएवढा क्रण बॅटच्या कडेला दिसला. देवाने ते त्याच्या बॅटला कधीही दृष्ट लागू नये म्हणून लावलेलं तीट होतं. त्यानंतर त्या बॅटला दृष्ट लावण्याची ताकदच कुणाच्या चेंडूत नव्हती. आज आपण, आपले नवव्या, दहाव्या क्रमांकाचे फलंदाज वेगवान चेंडूच्या रेषेत येऊन खेळताना पाहतो, त्या स्फूर्तीचा उगम सुनील गावसकरच्या बॅटमध्ये आहे. त्याच्या फलंदाजीने पिढय़ा घडवल्या. माझं तर आजच्या मुलांच्या आईवडिलांना सांगणं आहे की, तुमच्या मुलांसाठी ऍकॅडमी, कोचिंग वगैरे ठीक आहे; पण तो उमलत असताना त्याला सुनीलच्या फलंदाजीच्या चित्रफिती दाखवा. त्यापेक्षा मोठी फलंदाजीची ऍकॅडमी जगात नाही.

त्याने फक्त घडय़ाळावर नाही, तर कॅलेंडरवर नजर ठेवून फलंदाजी करून हिंदुस्थानी संघाला वाचवलं. काही वेळा जिंकून दिलं. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे, त्याने हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना ताठ मानेने फिरण्याचा हक्क दिला. प्रतिस्पर्ध्याला दबून राहायचे दिवस प्रथम त्याने संपवले. त्याने रस्ता खोदला, तयार केला. पुढे सचिन, विराटने त्याचा महामार्ग केला.
आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, त्याने जो निखळ आनंद वाटला त्याची किंमत कशात मोजायची? सुनीलची फलंदाजी पाहणं हा आनंदोत्सव होता. हे सर्व लिहिताना मला ते आनंदाने ओसंडून जाणारे क्षण आठवतायत.
देवाने सुनीलला शतकवीर केले. त्यामुळे आयुष्याच्या मैदानावर तो शतकवीर होणार हे विधिलिखित आहे. फक्त ते पाहायला आपल्याकडे आयुष्य आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
देवा, आमचे सर्व अपराध पोटात घेऊन तेवढी कृपा कर