राज्यात पावसाचे दमदार पुनरागमन

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

गेल्या दोन महिन्यांपासून दुरावा दिलेल्या वरुणराजाची श्रावणाच्या अखेरीला कृपा झाली. मराठवाडय़ात तो धो धो बरसला. आठ जिह्यातील १७० मंडळांत अतिवृष्टी झाली. नदी, नाले एक झाले. पिकांनी पुन्हा माना उंचावल्या. मराठवाडय़ाच्या उंबरठय़ावर धडकलेल्या दुष्काळाचे सावट धुऊन निघाले आणि शेतकऱयांनी उसासा टाकला आहे! दरम्यान, मराठवाडय़ात पावसामुळे ६ जणांचा बळी गेला आहे.

सुरुवातीला तुरळक ठिकाणी हजेरी लावल्यानंतर पावसाने मराठवाडय़ाकडे पाठच फिरवली होती. राज्यातील कानाकोपऱयात पाऊस होत असताना मराठवाडा मात्र आभाळाकडेच नजरा लावून बसला होता. अखेर श्रावणाच्या अखेरीस पावसाने मराठवाडय़ात पाऊल ठेवले. विभागातील नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, संभाजीनगर आणि जालना या आठही जिह्यांत हलक्या सरींनी सुरुवात झाल्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे. नांदेडसह सर्वच जिह्यांमध्ये पावसाने दाणादाण उडवली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 • मराठवाडय़ात सहा ठार
 • गेवराई तालुक्यातील पाथरवाला (बु.) येथील शेतकरी बंकट लक्ष्मण जाधव (५५) हे गोदावरीच्या पात्रातील विहिरीतून मोटार काढत असताना आलेल्या पुरात वाहून गेले.
 • नांदेडातील पांडुरंगनगरात तानाजी ऊर्फ शुभम शिंदे (१३) हा नाल्यात वाहून गेला.
 • परभणी जिल्हय़ातील पारवा गावात आम्रपाली भगवान येवले (१२), कीर्ती सोपान येवले (१९) या चुलत बहिणी ओढय़ाला आलेल्या पाण्यात वाहून गेल्या.
 • धानोरा (ता. पूर्णा) येथील प्रभावती गायकवाड (५८) यांच्या अंगावर भिंत पडून मृत्यू झाला.
 • मुदखेड तालुक्यातील पांगरगाव शिवारात नाल्याच्या पुरात संभाजी तळणे (२८) वाहून गेला.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर

पुणे-दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज खरा ठरत राज्यात दमदार कमबॅक केले. शनिवारी रात्रीपासून मराठवाडय़ात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली असून मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार पाऊस पडला. रविवारी सकाळपर्यंत मराठवाडय़ातील नांदेड येथे सर्वाधिक २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर मुदखेड, नायगाव, खारंघा, धर्माबाद, औसा, लातूर, धाराशीवसह अनेक भागांत अतिवृष्टी झाली. शनिवारी विदर्भात दमदार हजेरी लावणारा पाऊस रविवारी काहीसा ओसरला होता. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह उपनगरांमध्ये पाकसाची रिपरिप सुरू होती. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगरसह पश्चिम महाराष्ट्रात दिवसभर पावसाने जोर धरला होता.

जवळपास महिनाभर उघडीप दिलेल्या पावसामुळे खरीपाची पिके धोक्यात आली होती. मराठवाडय़ात तर पिके करपून गेल्याने उभ्या पिकांवर नांगर फिरवून, दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱयांवर आली होती. मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रातही खरीपाच्या पिकांना पावसाने जीवदान मिळणार आहे. रब्बी पट्टय़ातही आगाप ज्वारीच्या पेरणीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा

बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र रविवारी पूर्व विदर्भ आणि लगतच्या भागाकडे सरकले होते. सोमवारी कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्र, किदर्भ क मराठकाडय़ातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातही हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

उत्तर महाराष्ट्रात पाऊस; पिकांना जीवदान

नाशिक-नाशिक शहरासह ग्रामीण भागात शनिवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. तब्बल दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धुळे, जळगाव, नंदुरबार जिह्यांत जोरदार पाऊस झाला, यामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.

तीन तालुक्यांना प्रतीक्षा

चांदवड, मालेगाव, देवळा हे तालुके अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वदूर बरसलेल्या पावसाची या भागावर अवकृपा कायम आहे. अगदीच तुरळक पाऊस झाल्याने येथील खरीप हंगाम धोक्यात आला आहे.

धुळे, जळगावात समाधान

धुळे व जळगाव जिह्यात पावसाने सुरुवातीला तुरळक हजेरी लावली होती. दुबार, तिबार पेरण्याही वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. जळगाव शहरात दुपारी एक तास मुसळधार पाऊस झाला. आठवडे बाजार व रेल्वे स्थानक परिसरात रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले. लेंडीनाल्याला पूर आल्याने जळगावहून ममुराबादकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. जळगावला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण ९३ टक्के भरले. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव येथेही पाऊस झाला असून, या तालुक्यांना उपयुक्त ठरणाऱया गिरणा धरणात ५२, तर हतनूरमध्ये ४१ टक्के पाणीसाठा झाला. नंदुरबार जिह्याच्या काही भागातही आज दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला.

नदीपात्रातून कार काढल्या

नाशिकच्या गोदावरी नदीपात्रात संत गाडगे महाराज पुलाखालून स्कॉर्पिओ नेताना ती रोकडोबा तालीमजवळ अडकली, तसेच श्रीरामकुंडाजवळ उभी अल्टो कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. पंचवटी अग्निशमनच्या जवानांनी ही दोन्ही वाहने पाण्याबाहेर काढली.

मुंबईकरांना जुलै २०१८ पर्यंत पाण्याची चिंता नाही

मुंबई-मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. सातही तलावांत एकूण १३ लाख ५५ हजार ४०९ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा ३४७ दिवस पुरणारा असल्यामुळे मुंबईकरांची जुलै २०१८पर्यंत पाण्याची चिंता मिटली आहे.

मुंबईला दररोज ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा  केला जातो. मुंबईला पावसाळा संपल्यानंतर पुढील कर्षभरासाठी १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठय़ाची आकश्यकता असते. या वर्षी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रांत चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. गेल्या वर्षी २० ऑगस्ट २०१६ ला सर्व तलावांत मिळून १२,९८,३३७ दशलक्ष लिटर पाणीसाठा होता, मात्र या वर्षी २० तारखेला तलावांतील पाणीसाठा ५७,०७२ दशलक्ष लिटरने जास्त असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तलावांतील पाणीसाठा दशलक्ष लिटरमध्ये

 • मोडकसागर- १,२८,९१०
 • तानसा-१,४३,७६९
 • विहार-२१,५६०
 • तुळसी-८,०४६
 • अप्पर वैतरणा-१,९८,३२९
 • भातसा-६,६२,१६५
 • मध्य वैतरणा-१,९२,६२९
 • एकूण-१३,५५,४०९