Save आराध्या !

57

<<भक्ती चपळगावकर>>

आराध्याएक छोटीशी चिमणीसध्या हृदय प्रत्यारोपणासाठी सगळ्या सोशल साइट्सवरून आराध्याचा निरागस चेहरा समोर येतोय. आपणही आपल्याकडून जेवढा जमेल तेवढा हातभार लावूया!

आराध्या मुळे…शिशुवर्गात जाणारी एक आनंदी खेळकर मुलगी. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आराध्या आजारी पडली. तिच्या आजाराचे निदान झाल्यावर काही दिवसांत आराध्या बरी होऊन पुन्हा पहिल्यासारखी बागडू लागेल या आशेत असलेल्या तिच्या आईबाबांना जबरदस्त धक्का बसला. आराध्याला हृदयाचा गंभीर आजार झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. तिचा जीव वाचवायचा असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे हृदय प्रत्यारोपण. महिना दीडमहिन्यात आराध्याला हृदय मिळेल या आशेत असलेल्या तिच्या आईबाबांचा लढा चालू आहे. पण जसजसे दिवस उलटताहेत, तशी तशी लहानग्या आराध्याची तब्येत ढासळत आहे. आराध्याला हृदय मिळावं म्हणून तिचा बाबा, योगेश अक्षरशः दारोदार भटकतोय. आता त्याच्या बरोबरीने पत्रकार संतोष आंधळे हाही जीवाचं रान करून सेव्ह आराध्या नावाची मोहीम चालवतोय.

फेसबुक, ट्विटर या माध्यमांतून ‘सेव्ह आराध्या’ या मंत्राचा जप होत आहे. माध्यमांमध्ये ही लढाई सुरू करणारा संतोष गेली अठरा वर्षे आरोग्यविषयक बातमीदारी करत आहे. आराध्याचे हृदय प्रत्यारोपण करण्याची सुसज्ज तयारी पेडियाट्रीक ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर विजय अग्रवाल यांनी केली आहे. पण ही लढाई इतकी सोपी नाही, हृदय प्रत्यारोपणासाठी ब्रेनडेड अवयवदाता मिळणे गरजेचे आहे. त्यातही आराध्याचे वय लक्षात घेता. तिच्यासाठी हृदय मिळणे अजूनच अवघड झाले आहे.

डॉक्टर पंडीत यांच्या मते , हिंदुस्थानात आज किडनी, लिव्हर व हार्ट या अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण होते. त्यात किडनी आणि लिव्हर लाईव्ह डोनर किंवा जिवंत दात्यांकडून घेता येते. अर्थातच हृदय एकच आहे, त्यामुळे ते जिवंत दात्याला देता येत नाही, आणि फुफ्फुसं हा मानवासाठी अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, त्यामुळे आपण तेही जिवंत दात्याकडून घेऊ शकत नाही. या नव्या चळवळीच्या निमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते, की, माणुसकी फक्त आपण जिवंत असतानाच अंगीकारायची नसते. मृत्यूनंतरही तुमच्यातलं माणूसपण शिल्लक ठेवायचं असेल तर अवयवदानाची प्रतिज्ञा करा. लहानग्या आराध्याला तुमच्या हृदयात जागा द्या. ‘सेव्ह आराध्या’ हा संदेश घरोघरी पोहचवा.

तिची एकटीची लढाई नाही

दर पंधरा दिवसांनी आराध्या रुग्णालयात दाखल होते. तिथे दोन दिवस सलाईनमधून तिला जीवनावश्यक औषधं देऊन तिला पुढच्या पंधरा दिवसांसाठी घरी पाठवलं जातं. तिचा बाबा योगेश म्हणतो की, रुग्णालयातली आराध्याची खोली म्हणजे आमचं सेकंड होम झालं आहे, पण असं सेकंड होम कुणाच्या नशिबात येऊ नये. गेल्या वर्षी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेली आराध्या आता फार चालू शकत नाही, खेळू शकत नाही. थोडी हालचाल केली की दमते. असं असलं तरी दिवसभरातली औषधं न चुकता घेते. एवढं लहान लेकरू मोठय़ा धीरानं वागतंय. आराध्याची लढाई ही फक्त तिची एकटीची लढाई नाही.  आराध्या त्या हजारो लाखो हिंदुस्थानींची प्रतिनिधी आहे, जे मृत्यूशी लढत आहेत. त्यांना गरज आहे अवयवदात्यांची. एकेकाळी रक्तदानाची मोठी चळवळ आपल्या समाजाने उभी केली. तसाच लढा लढण्याची वेळ अवयवदानाच्या क्षेत्रात आली आहे.

अवयवदाता बनण्यासाठी

  •  आपल्या मृत्यूनंतर अवयवदान करून एखाद्याचे आयुष्य वाचवण्यासाठी तुम्ही अवयवदानाची प्रतिज्ञा घेऊ शकता.
  • त्यासाठी ‘नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लान्ट ऍण्ड टिश्यू ऑर्गनायझेशन’ किंवा ‘नोट्टो’ नावाची हिंदुस्थान सरकारची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुमच्या राज्यात कार्यरत असलेल्या प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण संस्थेची माहिती मिळेल आणि अवयवदानाची प्रतिज्ञा करण्यासंबंधीचा अर्जही मिळेल.
  • महत्त्वाच्या हॉस्पिटल्समध्ये (फोर्टीस, ज्युपिटर इत्यादी) अवयवदानविषयक समन्वयक काम करतात. त्यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांच्या मदतीने अर्जाची नोंदणी करता येईल.
  • प्रत्यारोपणासाठी दाता ब्रेनडेड असावा लागतो, एकूण मृत्यूच्या प्रमाणात हे प्रमाण अत्यल्प आहे. तरीही प्रत्येकजण मृत्यूनंतर डोळे, त्वचा यासारखे अवयव दान करू शकतात.
  • अवयवदानासाठी कुटुंबाची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे आपण जर अवयवदानाचा निर्णय घेतला असेल तर त्याची माहिती कुटुंबियांना अवश्य द्या.
  • आपल्या कुटुंबात मृत्यूचा दुःखद प्रसंग ओढवला तर अवयवदानाच्या पर्यायाचा विचार करा. त्यामुळे इतरांना नवे आयुष्य मिळू शकेल.
आपली प्रतिक्रिया द्या