संतोष जनक कॉमेडी

क्षितिज झारापकर । मुंबई

कलेच्या दुनियेत यशाची युक्ती कधीच ठरलेली नसते. नाटय़ व्यवसायाला जरी हल्ली बिझिनेस मानलं जात असलं (मराठी नाटकांवरही १८ टक्के जीएसटी लागू लागल्यामुळे सरकारदरबारी तरी हा बिझनेस मानला जातोय) तरी इथे बिझनेस मॅनेजमेंटचे कोणतेच निकष लागू होत नाहीत. या क्षेत्रात सर्जनशीलता हा प्रमुख घटक असल्याने असं असेल कदाचित. म्हणूनच मराठी व्यावसायिक नाटय़ निर्माते हे आपापल्या नाटकांची यशाची वेगवेगळी गणितं सतत मांडत असतात आणि हिशेब करून पुढे सरकत असतात. सध्याच्या हंगामात मराठी रंगभूमीवरच्या आजच्या सर्वात जुन्या निर्मात्याने असेच एक पक्के व्यावसायिक गणित मांडून एक नवीन मराठी नाटक आपल्यासमोर आणलेलं आहे. हे निर्माते आहेत वेद प्रॉडक्शन्सचे गोपाळ अलगेरी आणि त्यांचं नवीन नाटक आहे ‘अंदाज आपला आपला’.

या नाटकाचं व्यावसायिक गणित अगदी सोपं आहे. या गणिताला एक नाव आहे, संतोष पवार. गेली किमान १५ वर्षे व्यावसायिक रंगभूमीवर सातत्याने यशस्वी होऊन संतोष पवार हे व्यावसायिक यशाचं एक निश्चित गणित झालंय. तो एक गुणी रंगकर्मी आहे हे सांगणे न लगे. ‘अंदाज आपला आपला’ हे पुन्हा एकदा सब कुछ संतोषजनक असंच नाटक आहे. म्हणजे या नाटकात जवळ जवळ ९५ टक्के वेळ संतोष पवार रंगमंचावर प्रमुख कलाकार म्हणून उपस्थित आहे. संतोष पवार या नाटकाचा दिग्दर्शकही आहे. गोपळ अलगेरी यांनी अशा पद्धतीने आपलं व्यावसायिक गणित अचूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

एका हायफाय, पण तरीही कुडबुडय़ा ज्योतिषी आईची, तिच्या विज्ञानावर संपूर्ण विश्वास असणाऱया मुलीची, त्या ज्योतिषीकडे शिकायला आलेल्या मुलाची आणि मायलेकींना त्यांचा आधार असलेला कर्तापुरुष कालवश झाल्यानंतर सांभाळणाऱया सेक्रटरीची ही चौकोनी कहाणी. राजेश कोलंबकर या लेखकाने नाटकाला एक उत्तम जर्म दिलेला आहे. ज्योतिष्य शास्त्राबाबतची अंधश्रद्धा आणि विज्ञानाच्या वास्तवातील द्वंद्व यात संभवतं. ‘अंदाज आपला आपला’मध्ये विनोदाकरिता यातील अंधश्रद्धेचा संतोष पवार यानी यथेच्छ वापर केलेला आहे. पावलोपावली भविष्य वर्तवणारे भाबडय़ा जनतेला कसे लुबाडतात हे सेक्रेटरीच्या भूमिकेतून स्वतः संतोष पवार दाखवून देत हंशा वसूल करीत राहतात. ‘अंदाज आपला आपला’ नाटक यामुळेच कुठेही कंटाळवाणं होत नाही.

संतोष पवारने दिग्दर्शनातही सोपेपणा ठेवलाय. उत्स्फूर्त सुचलेल्या विनोदांवर बेतलेल्या नाटकांना हा सोपेपणा फार जरुरीचा असतो. दिग्दर्शनाच्या बैठकीत चापूनचोपून बसवल्यावर उत्स्फूर्तता हरवून जाते. मुळात ही उत्स्फूर्तता हा संतोष पवारांचा स्ट्रॉन्ग पॉइंट असल्याने हाच ‘अंदाज आपला आपला’ या नाटकाचाही स्ट्रॉग पॉइंट आहे. संतोष पवारची नाटकं म्हणजे फुल्ल टाईमपास हा प्रेक्षकांचा दृष्टिकोन कायम ठेवण्याचा वाक्या वाक्यागणिक आणि लकबी लकबीगणिक प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच ‘अंदाज आपला आपला’ हे नाटक.

वेद प्रॉडक्शन्सच्या या नवीन नाटकात पुनरागमन करणारी एक रंगकर्मी आहे. माधवी गोगटे हे नाव मराठी विनोदी नाटकांमधलं मुरलेलं नाव आहे. साहजिकच ‘अंदाज आपला आपला’ या नाटकात त्यांच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा असणार. माधवी गोगटे या अपेक्षा समर्थपणे पूर्ण करतात. विनोदी अभिनय हा विविध प्रकारचा असतो. मुख्यतः परफेक्ट टायमिंगने पंच लाइन्स टाकून रसिकांकडून हशा वसूल करणं हा प्रकार असतो, पण हा प्रकार तसा सोपा आहे. जास्त कठीण प्रकार आहे रंगमंचावर घडणाऱया घडामोडींना परफेक्ट टायमिंगने रिऍक्ट होणं. विनोदी नाटकात नटाच्या रिऍक्शनला जी ठोस दाद मिळते ती कित्येकदा वाक्याला मिळत नाही. चांगला विनोदी नट ऍक्टर असतोच, पण त्याहीपेक्षा चांगला रिऍक्टर असावा लागतो. माधवी गोगटे यांनी असंख्य विनोदी नाटकं केलेली असल्याने तो अनुभव त्या इथे चोख वापरतात. त्यांच्या या खुबीमुळे त्या संतोष पवार यांना पूर्णपणे कॉम्प्लिमेंट करतात. म्हणूनच ‘अंदाज आपला आपला’च्या विनोदाचं गाडं एकांगी धावल्यासारखं वाटत नाही. दोन खमके विनोदवीर रंगकर्मी हे नाटक आपल्या समर्थ खांद्यांवर लीलया पेलून नेतात.

इथे मात्र ‘अंदाज आपला आपला’मधील दोन नवोदित कलाकारांचं खूप कौतुक करावंच लागेल. मधुरा देशपांडे आणि अक्षय केळकर हे दोघेही आजच्या दुनियेतल्या उलटय़ा गंगेचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. पूर्वी शाळा-कॉलेजांतून एकांकिकांत, तिथून व्यावसायिक नाटकांत आणि मग टीव्ही मालिकांमधे असा रंगकर्मींचा प्रवास किंवा स्ट्रगल असे. ऍमॅच्युअर थिएटरच्या प्रोसेसमधून तावूनसुलाखून निघालेले कलाकार मग व्यावसायिक नाटक, टेलिव्हिजन आणि चित्रपटात जायचे. आता मात्र मालिका इतक्या फोफावल्या आहेत की, हा प्रवास उलटा झालाय. मधुरा अणि अक्षय दोघांचं हे पहिलंच नाटक, पण दोघे कुठेही तोकडे पडत नाहीत. मधुराने आईच्या विचारांच्या विरोधात असणारी आणि विज्ञानाच्या बाजूने असणारी मुलगी अप्रतिम उभी केलेली आहे. अक्षयने घरात शिकायला येणारा आणि घरातल्या मुलीच्या प्रेमात पडणारा प्रियकर कमालीचा तडफदार केलाय. पदार्पणातच असा छान अभिनय पाहून बरं वाटलं. प्रवाह उलटा वाहत असला तरी ताकदीचे कलाकार मराठीला मिळताहेत हे चित्र दिलासा देणारं आहे.

‘अंदाज आपला आपला’ची तांत्रिक अंगं व्यवस्थित सांभाळली गेली आहेत. साई पीयूष यांचं संगीत आणि त्यातही राजेश कोळंबकर लिखित गीत अतिशय छान आहे. प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य नेहमीप्रमाणे उत्तम आहे. सगळं जागच्या जागी असूनही एक बाब मात्र जाणवते. नाटकाचा गाभा ज्योतिष विरुद्ध विज्ञान असल्याचा दावा क्लायमॅक्समध्ये केला जातो. संपूर्ण नाटकात मात्र याचा उल्लेख आढळत नाही, पण संपूर्ण नाटकभर प्रेक्षक हसतमुख राहतात हा या विनय गोपाळ अलगेरी, किशोर सावंत अणि विवेक नाईक निर्मित नवीन नाटकाचा अंदाज आहे.

दर्जा – अडीच स्टार
नाटक – अंदाज आपला आपला
निर्मिती – वेद प्रॉडक्शन + किवी प्रॉडक्शन सहयोग
निर्माते – विनय गोपाळ अलगेरी, किशोर सावंत, विवेक नाईक
लेखक – राजेश कोळंबकर
नेपथ्य – प्रदीप मुळ्ये
संगीत – साई पीयूष
दिग्दर्शक – संतोष पवार
कलाकार – माधवी गोगटे, मधुरा देशपांडे, अक्षय केळकर, संतोष पवार

[email protected]