हिंदुस्थानी लष्करातली कमांडोंच्या पहिल्या महिला प्रशिक्षक

>>नमिता वारणकर

डॉ. सीमा राव. एकेकाळच्या मिस इंडिया आणि आता हिंदुस्थानी लष्कराच्या कमांडोंच्या पहिल्या महिला प्रशिक्षक.

कंमांडो’ म्हटल्यावर आपल्या डोळय़ांसमोर पहिल्यांदा पुरुष सैनिकाचीच छबी येते, मात्र डॉ. सीमा राव याला अपवाद आहेत. दररोज नव्या अडचणींचा सामना, अंगावर नवीन जखमा घेऊन वावरणं अशा क्षेत्रात त्यांचा आदर्श प्रत्येकासाठीच लाखमोलाचा आहे. याचे कारण गेल्या 20 वर्षांपासून त्या स्त्री आणि पुरुष जवानांना निःशुल्क प्रशिक्षण देत आहेत. शिवाय त्यांचे वैशिष्ट्य असे की, त्या जगातील 10 महिलांपैकी एक आहेत, ज्यांनी ब्रुस लीतर्फे आयोजित केलेल्या मार्शल आर्ट ‘जीत कुन डो’चे प्रशिक्षण घेतले आहे. याव्यतिरिक्त 8 पुस्तकांचं लेखन केले आहे.

कमांडो प्रशिक्षणाचा हा आव्हानात्मक प्रवास त्यांचे वडील प्रोफेसर रमाकांत सिनारी यांनी दिलेल्या देशभक्तीच्या संस्कारामुळे सुरू झाला. ते स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी गोव्याची पोर्तुगिजांकडून सुटका व्हावी यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. स्वातंत्रयुद्धाचे किस्से ऐकतच सीमा राव मोठय़ा झाल्या. तेव्हापासूनच त्यांच्या मनात देशसेवेचे बीज रोवले गेले. यामुळेच डॉक्टरकीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘क्रायसीस मॅनेजमेंट’ या विषयात एमबीएची पदवी प्राप्त केली.

त्यानंतर आर्मी, नेव्ही, सीमा, सुरक्षा दल आणि एनएसजीच्या प्रमुख कमांडोजना निःशुल्क कॉम्बॅट प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव आपल्या पतीसमोर ठेवला. जो त्यांना आणि त्यांनी सुरक्षा दलाच्या प्रमुखांनाही खूप आवडला. कारण ज्या ठिकाणी सीमा सरावासाठी जात असत तेथे त्यांचे मार्शल आर्टचे कौशल्य पाहून इतर सैनिकही आश्चर्यचकित व्हायचे. यामुळे त्यांनी सैनिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले. तेव्हापासून आजतागायत 15 हजार सैनिकांना एनएसजी ब्लॅक कॅटस, आयएएफ गार्डस, इंडियन नेव्ही मार्कोस आणि बीएसएफ कमांडो, एअर फोर्स यासह पॅराकमांडो, नॅशनल पोलीस ऍकॅडमी, सैन्य दलातील अधिकारी यांच्यासह 12 राज्यांतील पोलिसांनाही खास प्रशिक्षण दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या देशातील अशी पहिली व्यक्ती आहेत. ज्या अधिकृतरीत्या हिंदुस्थानी सैन्यात नसतानादेखील हिंदुस्थानी सैन्याच्या सर्व डिफेन्स फोर्सेसना कमांडो प्रशिक्षण देत आहेत.

कोणत्त्याही महिलेने स्वतःला कमी समजू नये. जे काम पुरुष करू शकतो ते प्रत्येक काम स्त्रीही करून दाखवू शकते. एखाद्या वेळी जर अपयशाचा सामना करावा लागेल तेव्हा त्याला निश्चयाने सामोरे जा. धैर्यवानालाच यश मिळते.स्वतःसमोर मोठे ध्येय ठेवा. नेहमीपेक्षा वेगळा विचार करायला शिका. याद्वारेच व्यक्तीचा जय-पराजय अवलंबून असतो, असे त्यांना वाटते.

मानधनाविना प्रशिक्षण हीच देशसेवा
डॉ. सीमा राव या कमांडो ट्रेनर असून त्या एक कॉम्बॅक्ट शूटिंग इंस्ट्रक्टर, फायर फायटर आणि स्कुबा ड्रायव्हर आहेत. रॉक क्लायबिंगमध्ये त्यांना एचआयएम पदक मिळालं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्या मिस इंडिया स्पर्धेच्या फिनालिस्टदेखील आहेत. त्या या कामासाठी कोणतेही मानधन घेत नाहीत. कारण त्यांच्या मते कमांडोंना प्रशिक्षण देणे ही देशसेवा आहे आणि त्यासाठी पैसे घेऊन त्याचा अपमान करायचा नाही आहे, असे त्यांना वाटते.

प्रशिक्षणाची पद्धत
क्लोज क्वार्टर बॅटल (सीक्यूबी) म्हणजे शत्रूच्या भूमीत जाऊन त्याच्यावर हल्ला करून सैनिक परत येतो. यामध्ये आपल्यापासून 30 मीटर अंतरावर असलेल्या शत्रूवर जमिनीवरून हल्ला कसा करायचा, यात विस्फोटक वापरणे किंवा बंद खोलीतून फायरिंग करणे शिकवले जाते. त्यानंतर काऊंटर टेररिझम ऑपरेशन. यामध्येही कमांडो दहशतवाद्यांशी समोरासमोर युद्ध करतात. अनआर्म्ड कॉम्बॅट म्हणजे कोणत्याही शस्त्राशिवाय युद्ध, शत्रूकडून गोळीबार होण्यापूर्वीच आपण गोळीबार कसा करायचा, तसेच ग्रुप शूटिंग यात सांघिकतेने शत्रूवर कशी गोळी झाडायची याचे प्रशिक्षण दिले जाते.

शिस्त, रणनीती आणि साहस
आतापर्यंत जवानांना दिलेल्या प्रशिक्षणात तुम्ही काय शिकलात असे विचारता त्या सांगतात, ‘शिस्त’ हेच सैनिकासाठी सगळय़ात मोठे शिक्षण आहे. कारण त्याशिवाय कोणतेही युद्ध यशस्वी होऊ शकत नाही. दुसरं रणनीती. याचा वापर करून पराभव झाला तरीही त्याचं रूपांतर युद्धात होऊ शकतं. त्यानंतर साहस महत्त्वाचं आहे. कारण पराभवाचा सामना करायचा असेल तर साहसाच्या बळावरच पुढे जाता येतं.

राव सिस्टीम ऑफ रिफ्लेक्ट फायर
जेव्हा शत्रू आपल्यापासून 30 मीटरच्या आत असतो तेव्हा रायफलने अचूक नेम धरुन त्याच्यावर गोळी झाडण्यासाठी 2 सेकंदही वेळ नसतो. अशा वेळी अर्धा सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी वेळेत शत्रूवर हल्ला करून त्याला पराभूत कसं करायचं, याची एक वेगळी पद्धत त्यांनी शोधली आहे. याला ‘राव सिस्टीम ऑफ रिफ्लेक्ट फायर’ म्हणतात.

[email protected]