मुंबईची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी तज्ञांची समिती नेमणार

सामना ऑनलाईन, मुंबई

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईत जागोजागी वाहतूककोंडी होत असून त्याचा नियमित फटका मुंबईकरांना बसत आहे. या वाहतूककोंडीवर वाहतूक विभागाकडूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने प्रवासी दररोज मेटाकुटीला येत आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्यानंतर मुंबईतील वाहतुकीची समस्या  सोडविण्यासाठी तज्ञांची समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आज उच्च न्यायालयात दिली.

शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूककोंडीत प्रवासी सापडत आहेत. शिवाय अवास्तव पार्किंगमुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडत आहे. याप्रकरणी जनहित मंच या सेवाभावी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. यासंदर्भात राज्य सरकारच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी यावेळी सांगितले की, या तज्ञांच्या समितीत महापालिका, एमएमआरडीए, पोलीस आणि राज्याच्या वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच वाहतुकीवर तोडगा काढण्यासाठी नागरिकांच्या सूचनाही विचारात घेतल्या जाणार आहेत. तज्ञांची समिती स्थापन करण्यात आल्यानंतर त्याबाबतची माहिती खंडपीठाला देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.