आत्महत्या करण्यासाठी ट्रॅकमध्ये उतरलेल्या नागरिकाला प्रवाशांनी वाचवले


सामना ऑनलाईन । मुंबई

सोमवारी दुपारी कुर्ला स्थानकात एका ५४ वर्षीय नागरिकाने ट्रॅकमध्ये उतरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानकातील प्रवाशांनी वेळीच ट्रॅकवर धाव घेत त्या नागरिकाचे प्राण वाचवले. नरेंद्र कोटेकर असे त्या नागरिकाचे नाव आहे. चेंबूर येथे राहणारे कोटेकर सोमवारी दुपारी कुर्ला स्थानकात घुसले आणि थेट ट्रॅकवर जाऊन झोपले. हा प्रकार पाहणाऱ्या नागरिकांनी लगेच स्वतः ट्रॅकमध्ये उडी टाकली आणि कोटेकर यांना तेथून बाजूला नेले. कौटुंबिक कलहामुळे प्रचंड नैराश्य आले आहे. म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे कोटेकर यांनी आरपीएफच्या जवानांना सांगितले. जवानांनी मग कोटेकर यांचे समुपदेशन केले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांना त्यांच्या ताब्यात दिले.