पीएफचे पैसे लाटणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल

1

सामना ऑनलाईन । डोंबिवली

कर्मचाऱ्यांचा पीएफ परस्पर आपल्या बँक खात्यात जमा केल्याप्रकरणी भिवंडीतील भाजप नगसेविका दीपाली भोईर यांच्या विरोधात ठाण्यात तर जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक शैलेश धात्रक यांच्याविरोधात डोंबिवलीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिवीगाळप्रकरणी मनसे नगरसेवक मंदार हळवे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या प्रकणात भाजपच्या दोन तर मनसेच्या एका नगरसेवकावर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुरबाड तालुक्यातील विद्यावासिनी स्टिल प्रोडक्टस तसेच वाडा तालुक्यातील मश्सेस कुडूस स्टिल रोलिंग या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे सहा लाख ४७ हजार ५५२ रुपयांचा प्रोव्हिडंड फंड ठाण्यातील भविष्यनिर्वाह कार्यालयात जमा करण्यात आले होते. मात्र कपंनीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची नावे फॉर्म १९ वर टाकून त्यावर स्वतःचे बँक खाते क्रमांक टाकले आणि कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम काढून ती आपल्या खात्यात जमा केली. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये भिवंडीतील भाजप नगरसेविका दीपाली भोईर यांचेही नाव आहे. तर डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात पालिका अधिकारी भागाजी भांगरे यांनी भाजप नगरसेवक शैलेश धात्रक व मनसेचे विरोधी पक्षनेते मंदार हळवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.