पटवा बिल्डरविरोधात तक्रार दाखल

सामना ऑनलाईन । ठाणे

भिवंडीमधील एका प्रोजेक्टमध्ये घरासाठी कोटय़वधी रुपये गुंतविलेल्या दोन हजार ग्राहकांची घोर फसवणूक करण्यात आली आहे. पैसे देऊन सात वर्षे उलटली तरीही एकही फ्लॅट अद्यापि बिल्डरने न दिल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी ‘महावीर बिल्डर्स डेव्हलपर्स ऍण्ड कन्स्ट्रक्शन प्रा.लि.’ या कंपनीच्या संचालकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या फसवणुकीमुळे असंख्य ग्राहक एकत्र आले असून त्यांनी बिल्डरच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार केला आहे.

महावीर बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्सने २०१० साली भिवंडीजवळील खारबाव तसेच पायगाव या ठिकाणी भव्य गृहप्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. तशी जाहिरातबाजीही केली. महावीर सृष्टी, महावीर गॅलक्सी, महावीर सिटी, महावीर रतन, महावीर पार्क ही प्रकल्पांची नावे असून सुमारे सहाशेहून अधिक इमारती बांधण्यात येणार होत्या. महावीर बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्सचे मुख्य संचालक राजेश पटवा हे असून या कंपनीत अन्य सात संचालकदेखील आहेत.

ग्राहकांना दाखवली आमिषे
सदर बिल्डरने विविध प्रकारची आमिषे ग्राहकांना दाखविली. एका चौरस फुटामागे १ हजार ४०० ते २००० रुपये एवढा दर होता. या गृहप्रकल्पांमध्ये सर्व सोयी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनदेखील दिले होते. त्यामुळे सुमारे दोन हजार सर्वसामान्य ग्राहकांनी डोळे झाकून पैसे गुंतवले. सुमारे २० ते ९० टक्क्यांपर्यंत बिल्डरकडे पैसे जमा झाले, मात्र प्रत्यक्षात सात वर्षे उलटली तरीही एकही इमारत बांधली नसल्याचा आरोप जयसिंग यादव या ग्राहकाने केला आहे. याबाबत भिवंडी पोलीस ठाण्यात बिल्डरविरोधात तक्रारही दाखल झाली असून सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.