किल्ले सिंधुदुर्गवरील भगवा ध्वज विनापरवाना, पुरातत्व विभागाची पोलिसात तक्रार

सामना प्रतिनिधी । मालवण

किल्ले सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावरील नगारखान्यावर किल्ले रहिवाशांनी उभारलेल्या भगव्या ध्वजास पुरातत्व विभागाच्या चौकीदारांनी विरोध दर्शवला आहे. मात्र किल्ले रहिवासी यांनी ध्वज हटविण्यास नकार दिल्याने चौकीदार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ध्वज उभारलेल्या किल्ल्याच्या जागेची नेमकी मालकी कोणाची आहे. याबाबत कागदपत्रांसह पुरातत्व विभागच्या अधिकाऱ्यांनी तक्रार द्यावी, अशी सूचना पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी चौकीदार यांना केली आहे. तर या प्रकरणी किल्ले रहिवासी यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एकूणच या प्रकरणाने दोन दशकांपूर्वीच्या झेंडा आंदोलनाच्या आठवणी जाग्या झाल्या.

किल्ले सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावरील नगारखान्यावर राम नवमी उत्सव व अन्य काही वेळा ध्वज उभारण्याची परंपरा आहे. गतवर्षी किल्ले प्रवेशद्वारासमोर असलेला मोठा लोखंडी ध्वज पावसात कोसळला. त्यावेळी नगारखान्यावर उभारलेला ध्वज अनेक दिवस होता. मात्र आमदार वैभव नाईक यांनी प्रवेशद्वारासमोर कोसळलेला ध्वज पुन्हा उभारला. असे असताना सोमवारी रात्री किल्ले रहिवासी यांनी नगारखान्यावर ध्वज उभारला. हा ध्वज पुरातत्व विभागाची कोणतीही परवानगी न घेता उभारला. त्यामुळे ध्वज काढावा असे पुरातत्व विभागाच्या चौकीदार यांनी किल्ले रहिवासी यांना सांगितले. मात्र किल्ले रहिवासी यांनी ध्वज हटविण्यास नकार दिला. याबाबत किल्ले चौकीदार यांनी मालवण पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. मात्र तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला.

मालकीची कागदपत्र अधिकाऱ्यांनी सादर करावी

किल्ले सिंधुदुर्गवर खाजगी, शासकीय व पुरातत्व विभाग अशी मालकी आहे. अशा स्थितीत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ध्वज उभारणी केलेल्या जागेच्या मालकीची कागदपत्र सादर करून शासकीय जागेत विनापरवानगी ध्वज उभारला. अशी तक्रार नोंदवावी अशी सूचना पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी चौकीदार यांना केली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही तक्रार पोलीस ठण्यात दाखल नव्हती.