अमित शहांना ‘पकोडा’ बाधला, खटला दाखल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भारतीय जनता पार्टीला पकोडा प्रकरण शेकणार असल्याचे दिसत आहे. पकोडा रोजगाराची तुलना भिकाऱ्यांबरोबर केल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मुजफ्फरनगर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशमी यांनी हा खटला दाखल केली आहे. मुख्य न्याय दंडाधिकारी हरी प्रसाद याप्रकरणी २८ फेब्रुवारीला सुनावणी करणार आहेत.

‘७ फेब्रुवारीला अनेक टीव्ही चॅनेवरून प्रसारित झालेल्या बातम्यांमध्ये अमित शहा यांनी बेरोजगार तरुणांनी पकोडा विकला तर त्यात काही वाईट नसल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला होता. शहा यांच्या वक्तव्यामुळे तरुणांमध्ये हीन भावना उत्पन्न होत आहे. उच्च शिक्षित तरुणांच्या भावनांना शहा यांच्या या वक्तव्यामुळे ठेच लागली आहे,’ असे हाशमी यांनी म्हटले आहे. शहा यांच्या या वक्तव्यामुळे आपल्याला त्रास झाल्याचेही त्या म्हणाल्या.

‘सरकार उच्च शिक्षित तरुणांना योग्य प्रकारची नोकरी किंवा रोजगाराचे साधन उपलब्ध करून देऊ शकत नसेल तर सरकारने अशा तरुणांची चेष्टा-मस्करी करणारे वक्तव्य करू नयेत. पकोडे विकण्यासाठी देशातील तरुण उच्च शिक्षण घेतात का? असा सवाल हाशमी यांनी उपस्थित केला आहे. शहा यांचा वक्तव्यामुळे नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांमध्ये अनुत्साहाचे वातावरण तयार होत आहे’, असेही त्या म्हणाल्या.

याआधी ५ फेब्रुवारीला राज्यसभेमध्ये अमित शहा यांनी आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या एका मुलाखतीतील वक्तव्याचा बचाव करताना पकोडा विकण्यात काहीच वाईट नसल्याचे म्हटले होते. ‘भीक मागण्यापेक्षा चहा किंवा पकोडा विकणे कधीही चांगले आहे,’ असे शहा यांनी म्हटले होते.