प्राणिमात्र संकल्पना

संत फ्रान्सिस ऑफ असिसी

>>प्रतीक राजूरकर<<

हिंदू संस्कृतीत प्राचीन काळापासून सर्वच प्राण्यांविषयी समानभावाचे अस्तित्व आहे, देवांचे अवतार अथवा देवी देवतांची वाहने म्हणून प्राण्यांचे महत्त्व आहे, योग्य तत्त्वज्ञानातून त्याचा बोध होतो. प्राणिमात्र संकल्पनेत सर्वच जिवांचा समावेश आहे त्यात मनुष्यप्राणीसुद्धा समाविष्ट आहे इतकी व्याप्ती प्राणिमात्र शब्दात अनेक संतांनी वर्णन केली आहे, पसायदानात सर्वच प्राणिमात्रात समानता निर्माण होऊन दुष्ट भावनांचा नाश व्हावा म्हणून ‘दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्ये पाहो। जो जे वांछिल तो ते लाहो। प्राणिजात’ असे वर्णन आहे. सर्व संतांनी प्राणिमात्राविषयी आपल्या अभंगातून मार्गदर्शन केले आहे, आज जागतिक प्राणी दिवस हा अशाच एका संताच्या स्मृतीत साजरा केला जातो. जागतिक प्राणी दिवस ही सामाजिक चळवळ जगभर विस्तारली गेली आहे. जागतिक प्राणी दिवसाची संकल्पना हेईनरिच झिमरमैन्न (Heinrich Zimmermann) १८८७-१९४२ या कालावधीतील जर्मन लेखक आणि संपादकाने पहिल्यांदा मांडली, झिमरमैन्न हे जर्मन भाषेतील Mensch and Hund (माणूस आणि कुत्रा ) पाक्षिकाचे प्रकाशक होते, दर पंधरवडय़ात झिमरमैन्नचे पाक्षिक प्रकाशित व्हायचे, त्यात प्राण्यांवर होत असलेली क्रूरता, संवर्धन, पालन यावर मार्गदर्शक लेखन, माहितीचा समावेश असायचा. सर्वात पहिला जागतिक प्राणी दिवस २४ मार्च १९२५ साली बर्लिन येथील स्पोर्टस् पॅलेसला साजरा करण्यात आला. जवळपास ५ हजार प्राणीप्रेमी लोक त्यात सहभागी झाले होते. झिमरमैन्न यांनी लोकसहभातून स्थापन केलेल्या जागतिक प्राणी दिवस समितीने ४ ऑक्टोबर हीच तारीख निश्चित केली होती, पण हजारो लोकांची व्यवस्था होऊ शकणारे स्पोर्ट पॅलेस त्या वर्षी ठरविलेल्या दिवशी उपलब्ध नव्हते म्हणून २४ मार्च १९२५ साली आयोजन करण्यात आले आणि पहिल्यांदा ४ ऑक्टोबर १९२९ पासून सुरू झाला तो आज पण सुरू आहे. अनेक ठिकाणी ऑक्टोबरचा पहिला आठवडा हा जागतिक प्राणी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. झिमरमैन्न स्वतः प्राणी संरक्षणात कार्यरत होते, सुरुवातीला त्यांना केवळ जर्मनी, ऑस्ट्रीया, स्वित्झर्लंड याच देशांचा पाठिंबा मिळाला. असिसी येथील कॅथोलिक फ्रान्सिस संप्रदायाचे फ्रान्सिस ऑफ असिसी म्हणून प्रसिद्ध संत होऊन गेले ज्यांचा काळ ११८१-१२२६ मानला जातो, मध्यवर्ती इटली येथे असिसी म्हणून त्यांचे स्थान प्रख्यात आहे, ते स्वतः प्राण्यांचे आश्रयदाते आणि पर्यावरणतज्ञ असल्याची श्रद्धा युरोपियन देशात आहे म्हणून त्यांना संतपद बहाल करण्यात आले. ते प्राण्यांसोबत संवाद साधायचे, त्यांना शिकवायचे अशी युरोपियन देशांतील लोकांची धारणा आहे, त्यांचा मृत्यू हा ४ ऑक्टोबरला झाल्यामुळे हाच दिवस त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून निवडला गेला. त्यांच्या मृत्यू पश्चात ७०५ वर्षांनी फ्लोरेन्स येथील परिषदेत झिमरमैन्नच्या अथक परिश्रमामुळे सर्वानुमते त्याला मान्यता प्राप्त झाली. जागतिक प्राणी दिवसाचा आज जगात विस्तार झाला आहे.

 जागतिक प्राणी दिवसाची संकल्पना सर्वप्रथम मांडणारे जर्मन लेखक व संपादक हेईनरिच झिमरमैन्न

जागतिक प्राणी दिवसाची संकल्पना सर्वप्रथम मांडणारे जर्मन लेखक व संपादक हेईनरिच झिमरमैन्न