मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा


सामना प्रतिनिधी, जालना

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी लोकप्रतिनिधींसोबत मंगळवार, २८ रोजी जालना जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय मंत्री व आमदारांनी घेतला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी सायंकाळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व समाजबांधव यांची दोन तास मॅरेथॉन बैठक झाली.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही सर्वांचीच आग्रही भूमिका आहे. त्यासाठी जे करायची आवश्यकता आहे ते करू, अशी ग्वाही लोकप्रतिनिधींनी दिली. विशेष अधिवेशनाचा निर्णय न झाल्यास लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला. यावेळी समाजबांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या व अन्य मागण्यांसाठी राज्यभरात मूक व ठोक मोर्चे काढण्यात आले. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देऊ, अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे.

मात्र, राज्य सरकार टिकणारे आरक्षण कसे देणार, हे राज्य सरकारने स्पष्ट करावे, अशी समाजबांधवांची भूमिका आहे. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्पâत दहा लाखांचे कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी शासनाने आपला वाटा काढला आहे.

वसतिगृह, विद्याथ्र्यांचा निर्वाह भत्ता, शैक्षणिक शुल्कमाफी, सारथी संस्था याबाबतच्या अध्यादेशांची अंमलबजावणी झाली नाही. ती करण्यासोबतच समन्वयकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. तसेच मराठा आरक्षणासाठी तात्काळ विशेष अधिवेशन बोलवावे, यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढवावा, अशा आग्रही मागण्या समाजबांधवांनी केल्या. २० सप्टेंबरपर्यंत अधिवेशन न झाल्यास मुंबईतील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. या बैठकीस समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

विशेष अधिवेशनासाठी आग्रह धरणार

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल न्यायालयात मांडून न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. यासाठी समाजबांधवांच्या मागणीनुसार २० सप्टेंबरच्या आत अधिवेशन घ्यावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार असल्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

बैठकीत सकारात्मक निर्णय होईल : राज्यमंत्री खोतकर

मराठवाड्यातील मंत्री व सर्वपक्षीय आमदारांना सोबत घेऊन उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहोत. आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाबाबत आग्रही असून, उद्याच्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी यावेळी व्यक्त केला. आरक्षणासाठी दोन आठवडे सभागृह बंद पाडल्याची आठवणही त्यांनी करून दिली. समाजबांधवांच्या तीव्र भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असून, मराठा समाज आरक्षणास कशा पद्धतीने पात्र आहे, याचे पुरावे सादर करणार असल्याचे राज्यमंत्री खोतकर यांनी सांगितले.