गडकरींच्या दौऱ्यानंतर आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली

सामना प्रतिनिधी । सोनई

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे रविवारी शनिशिंगणापूर येथे शनैश्वराच्या दर्शनासाठी आले होते. ते आले अन् निघूनही गेले. मात्र, त्यानंतर माजी आमदार शंकरराव गडाख आणि आजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, या दोन नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांनी नेवाशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सोनईत पत्रकार परिषद घेऊन गडकरींच्या दौऱयात आम्हाला गडकरींना भेटू दिले नाही, नेवासा तालुक्यात रस्तेकामात लाखोंचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी भेट नाकारली असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला आज आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रत्युत्तर दिले. शनिशिंगणापूर देवस्थानात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी अंतिम टप्यात आली आहे. देवस्थान आपल्या ताब्यात घेऊन शंकरराव गडाखांनी गैरव्यवहार केल्याचे समोर आलेले आहे. विश्वस्त मंडळ नेमताना स्वतःचे लेटरहेड देऊन धर्मादाय आयुक्तांवर दबाव टाकला आहे. त्याचा भंडाभोड झाल्यानेच व देवस्थान बरखास्त होणार या भीतीने शंकरराव गडाखांनी गडकरी यांना सोनईत आणण्यासाठी मोठा आटापिटा केल्याचा जाहीर आरोप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.