परीक्षा केंद्रावर गोंधळ, कनिष्ठ अभियंत्यांची भरती

exam
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या ऑनलाईन परीक्षा शहरातील पाच परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. हडकोतील एका परीक्षा केंद्रावर ओळखपत्राची सत्यप्रत नसल्यामुळे अनेक परीक्षार्थींना अडविण्यात आल्याने गोंधळ उडाला होता. प्रसारमाध्यमाच्या एका प्रतिनिधीने केंद्रप्रमुखांशी चर्चा करून मार्ग काढल्यामुळे त्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला.

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ अभियंतापदाच्या रिक्त जागा भरण्यात येत असून, या पदाची ऑनलाईन परीक्षा महाआयटीअंतर्गत ‘अर्चीस टेक्नॉलाजी’ हे घेत आहे. शहरातील पाच केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. जळगांव टी पॉइंट येथील ड्रीमलाईन स्कूलमध्ये परीक्षा केंद्रावर आज सकाळी परीक्षार्थींना ओळखपत्राची सत्यप्रत नसल्यामुळे अडविण्यात आले. परीक्षार्थींनी डिजिटल आधार कार्ड दाखविल्यानंतरदेखील त्यांना परीक्षा केंद्रामध्ये घेण्यात येत नसल्यामुळे परीक्षार्थींनी प्रवेशद्वारावरच ठिय्या दिला.

आधार कार्डची सत्यप्रत आहे, आता डिजिटल कार्डमध्ये येते. हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित अधिकारी, कर्मचारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी जवळपास २० परीक्षार्थींना बाजूला उभे केल्यामुळे त्या विद्याथ्र्यांना परीक्षा केंद्रात जाण्यासाठी उशिर होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरदेखील त्यांनी सोडण्यास नकार दिला. त्यामुळे परीक्षार्थींचा हिरमोड झाला. आपल्याकडे सर्व सत्यप्रतीत कागदपत्रे असताना आपण परीक्षेला मुकणार, असे समजताच त्यातील एका परीक्षार्थीने प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीला मोबाईलवरून कळविले.

प्रसारमध्यमाचा प्रतिनिधी परीक्षा केंद्रावर आल्यावर त्यांनी केंद्रप्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला, तो मार्ग अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना परीक्षा केंद्रात घेण्याची सूचना केंद्रप्रमुखांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्यामुळे २० परीक्षार्थींना परीक्षा केंद्रामध्ये घेतले.

परीक्षार्थी आले उशिरा : भांडारकर
ऑनलाईन परीक्षा सकाळी दहा वाजता असल्यामुळे परीक्षार्थींना हॉलतिकीटवर दिलेल्या सूचनेनुसार केंद्रावर ९० मिनिटेअगोदर येण्याचे कळविण्यात आले. परीक्षार्थी आल्यानंतर ऑनलाईन त्यांचे थम्ब आणि फोटो घेऊन संगणक देण्यात येते. संगणक मिळाल्यावर युजर्सला दहा वाजता पासवर्ड दिला जातो. जे दहा वाजेच्या नंतर येतील, त्यांना आत प्रवेश देण्यात आला नसल्याचे केंद्रप्रमुख शीतलकुमार भांडारकर यांनी सांगितले. जो उशिरा आला त्याला संगणक मिळाला तरी, त्यांच्या नावाचे पोर्टल उघडूच शकत नाही, असे भांडारकर यांनी स्पष्ट सांगितले. या परीक्षा केंद्रावर निरीक्षक म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, महाआयटीचे कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील एक अधिकारी नियुक्त होते.