काँग्रेस नेत्यांनी घेतला सोन्याच्या ताटात शाही मेजवानीचा आस्वाद

 

सामना ऑनलाईन। उस्मानाबाद

राज्यातील शेतकरी आणि गरीब जनतेच्या नावाने गळा काढणारया काँग्रेसच्या नेत्यांचा खोटारडेपणा समोर आला आहे. उस्मानाबाद येथे प्रचाराच्या निमित्ताने आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे व इतर नेत्यांनी एका कार्यकर्त्याच्या घरात सोन्याच्या ताटात शाही मेजवानीचा आस्वाद घेतल्याचे समोर आले आहे.

उस्मानाबादमध्ये काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, आमदार बसवराज पाटील या सर्व नेते मंडळींच्या जेवणाची व्यवस्था एका कार्यकर्त्याच्या घरी करण्यात आली होती. या शाही भोजनासाठी विशेष बडदास्तही ठेवण्यात आली होती. प्रशस्त अशा हॉलमध्ये डायनिंग टेबलवर जेवणासाठी सोन्याचे ताट, वाट्या मांडण्यात आल्या होत्या.पाहुण्यांसाठी खास पंचपक्वान बनवण्यात आले होते.एवढेच नव्हे तर पाहुण्यांना वाढण्यासाठी दोन वाढपीही नेमण्यात आले होते.

कुठलाही मोठा सभारंभ नसताना मिळालेली ही रॉयल ट्रिटमेंट बघून नेतेही हरखून गेले आणि काहीही प्रश्न न करता त्यांनी मेजवानीवर पोट भरुन ताव मारला.

नेत्यांच्या या प्रतापा मुळे गरीबांसाठी कळवळा दाखवणाऱ्या कॉंग्रेसची डोकेदुखी नक्कीच वाढली आहे.