मुंबईत ‘आघाडी’ नाहीच!

राष्ट्रवादीची ४५ उमेदवारांची पहिली जादी जाहीर

मुंबई– मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ‘आघाडी’ अखेर झालीच नाही. राष्ट्रवादीने आज महापालिका निवडणुकीसाठी आपल्या ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राष्ट्रवादीच्या यादीमुळे संतापलेल्या काँग्रेनेही स्वबळाचा नारा दिला असून लवकरच त्यांचीही यादी जाहीर होईल, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.

मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होईल. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होईल, असे चित्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून रंगवले जात होते; पण आज राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांनी राष्ट्रवादीच्या ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि काँग्रेसला धक्काच दिला. विशेष म्हणजे अहिर यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल, असे सांगितले होते. आहिर यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन यादीही जाहीर केली.

पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आदेश घेऊनच ही यादी जाहीर करत असल्याचे अहिर यांनी सांगितले. पुढील यादीत तरुण, सुशिक्षित उमेदवार तसेच समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व दिले जाईल आणि मुंबई महापालिका निवडणूक राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने लढणार, असेही ते म्हणाले.

आघाडी झाली असती तरी काँग्रेसने गेम केला असता
मुंबईत आघाडी केली असती तरी काँग्रेसने आमचा गेमच केला असता, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या एका नेत्याने खासगीत व्यक्त केली. जिंकून येण्यापेक्षा राष्ट्रवादीचे उमेदवार कसे पाडता येतील याचाच प्लॅन काँग्रेसच्या गोटात शिजत होता. तशी ‘टीप’ही आम्हाला मिळाली होती. म्हणूनच मग या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, असे या नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

नोटाबंदीविरोधात ९ तारखेला राज्यव्यापी आंदोलन
देशातील काळे धन संपवण्यासाठी तसेच दहशतवादी कारवायांची आर्थिक रसद तोडण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून म्हटले जात होते. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादीने केले होते. या निर्णयाची योग्य अंमलबजावणी न झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय पूर्णत: फसला असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली. गेल्या ५० दिवसांत दहशतवादी हल्ल्यात ३०हून अधिक जवानांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. व्यापार मंदावले आहेत. देशात आर्थिक मंदीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जनतेच्या आक्रोशाला आवाज देण्यासाठी येत्या ९ जानेवारीला राष्ट्रवादी राज्यभरात तीव्र निषेध आंदोलन करणार आहे, असेही ते म्हणाले.

संधी मिळालेले विद्यमान नगरसेवक
रूपाली अजित रावराणे, मीनाक्षी पाटील, नंदकुमार वैती, राखी जाधव, सईदा आरीफ खान.

निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या नगरसेवकांच्या पत्नी
हरून खान यांच्या पत्नी ज्योती हरून खान, धनंजय पिसाळ यांच्या पत्नी भारती धनंजय पिसाळ तर चंदन शर्मा यांच्या पत्नी चारू चंदन शर्मा यांना राष्ट्रवादीकडून लढण्याची संधी देण्यात आली आहे.