नोटबंदीविरोधात नागपूरमध्ये काँग्रेसचे आंदोलन


सामना ऑनलाईन । नागपूर

नोटबंदीविरोधात कॉग्रेसने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी तीव्र निदर्शने करून मोदी सरकारचा निषेध करताना संतप्त कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला.

यावेळी मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय मोहम्मद तुघलकीचा निर्णय ठरल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी यावेळी बोलताना केला. चलनी नोटा घेण्यासाठी रांगेत उभे असलेल्या १०२ लोकांचे प्राण गेले़. या प्रकरणी सरकारविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केली़

शुक्रवारी (६ जानेवारी) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्या हजारो कार्यकर्त्यांनी धडक दिली़. यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी व भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने केली. नोटाबंदी फेल झाली, मोदींची भेल झाली, गरिब कास्तकारांचे प्राण घेणाऱ्या सरकारविरुद्ध गुन्हा दाखल करा, मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. हा मोर्चा विलास मुत्तेवार, विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

यावेळी नेत्यांनी मोदी सरकारविरुद्ध भाषणे करून आपला निषेध व्यक्त केला. कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता कडक पोलीस बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तैनात करण्यात आला होता. काँग्रेसचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर अडविण्यात आल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यादरम्यान, संतप्त कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा देत त्यांचा पुतळा जाळून रोष व्यक्त केला

यावेळी पत्रकारांशी बोलताना विलास मुत्तेमवार म्हणाले, दहशतवाद्यांची मुंडके छाटून आणू, अशा वल्गना करणारे नरेंद्र मोदी पाकिस्तानात जावून नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कापून आले. ते दहशतवाद्यांचे मुंडके, पाकिस्तानी सैनिकांचे मुंडके काय कापणार असा सवाल मुत्तेमवार यांनी उपस्थित केला. इंग्रजाविरोधात लढा देणारी काँग्रेस आता रस्त्यावर उतरली असून मोदी सरकारच्या हुकुमशाही प्रकाराला घाबरणार नाही, असा इशारा देताना ते म्हणाले की, नोटबंदी संपूर्णत: फसली असल्यामुळे नरेंद्र मोदी आता जुन्या वल्गना लागले आहेत.

छप्पन इंची छाती असल्याचे सांगणारे मोदी दहशतवाद्यांविरुद्ध काहीच करू शकले नाहीत. याउलट रोज पाकिस्तानचे हल्ले देशावर सुरू आहेत. मुंडकी छाटण्याची हिम्मत भाजपात नाहीच, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली़ अभिजीत वंजारी, प्रशांत धवड, अशोक धवड,विशाल मुत्तेमवार यांच्यासह शहरातील काँग्रेसेचे सर्व नेते, पदाधिकारी व नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले़. महिलांचा सहभाग लक्षणीय होता

चतुर्वेदी, राऊत बेपत्ता

काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले. मोदी सरकारविरोधात देशभरात आंदोलनांचा एल्गार करण्यात आला आहे. प्रदेश काँग्रेसतर्फेही तशा सुचना देण्यात आल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नोटाबंदीच्या विरोधात निदर्शने करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र शहरातील राऊत आणि चतुर्वेदी गटाने प्रदेशाध्यक्षांचे आदेश धुडकावून लावल्याचे चित्र पहायला मिळाले. हे दोन्ही नेते या आंदोलनात नव्हते