गांधी हत्येचा फायदा काँग्रेसलाच!

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

अंहिसेच्या तत्त्वांवर चालणाऱ्या महात्मा गांधी यांच्या हत्येमुळे काँग्रेसचाच फायदा झाल्याची जळजळीत टीका भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केली आहे. अहमदाबाद येथे पत्रकारांना उत्तर देताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

गोडसे यांनी म. गांधी यांची हत्या केली तेव्हा पासून हा मुद्दा कायम चर्चत राहिला आहे, पण त्याचा फायदा कुणाला झाला असा प्रश्न मी मीडियाच्या माध्यमातून जनतेला विचारते, असं उमा भारती म्हणाल्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस बरखास्त करून पुन्हा नेत्यांनी जनतेत जाऊन निवडून यावे अशी गांधीजींची इच्छा होती. मात्र तसे झाले नाही. याच दरम्यान गांधीजींची हत्या झाली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघाला त्याचा फटका बसला. त्यामुळे काँग्रेस बरखास्तीचा मुद्दा बाजूला राहिला आणि त्यांना फायदाच झाला, असंही त्या म्हणाल्या.

मुंबईत राहणारे हिंदुस्थानच्या इतिहासाचे अभ्यासक आणि अभिनव भारत संघटनेचे विश्वस्त पंकज फडणीस यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असून गांधी हत्याप्रकरणावरील संपूर्ण पडदा उघडून धक्कादायक माहिती समोर येईल, असा त्यांचा दावा आहे.