काँग्रेसच्या साथीने अराजकीय मंच ,मोदींविरोधात भाजप बंडखोरांची मोर्चेबांधणी

सामना ऑनलाईन, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकाधिकारशाहीविरोधात पक्षात नाराज असलेले सारे बंडखोर एकवटू लागले असून त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव हे आपले एकच लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासाठी बंडखोरांनी काँग्रेस नेत्यांची साथ घेत मोर्चेबांधणीही सुरू केली असून एका संयुक्त अराजकीय मंचाची स्थापना आज मुंबईत करण्यात आली.

या संयुक्त मंचाच्या स्थापनेच्या बैठकीला ज्येष्ठ भाजप नेते यशवंत सिन्हा, खासदार शत्रुघ्न सिन्हा, आमदार आशीष देशमुख, काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नवनिर्वाचित खासदार कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, खासदार माजिद मेमन, सुधिन्द्र कुलकर्णी, निवृत्त न्यायाधीश अभय ठिपसे, वकील अभा सिंग, पत्रकार प्रीतीश नंदी, तुषार गांधी, आपच्या प्रीती मेनन आदी नेते उपस्थित होते.

आजच्या बैठकीत शेतकऱयांची कर्जमाफी, बेरोजगारी, उद्योगांची होणारी पीछेहाट आदी ज्वलंत प्रश्नांवर आणि त्यासाठीच्या आंदोलनाच्या आखणीबाबतही चर्चा झाली. येत्या १ मे रोजी राज्यात मोदी सरकारविरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सरकारने ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्रा’च्या घोषणा दिल्या. मात्र या घोषणा फसव्या निघाल्या असून त्यातून काहीच साध्य झालेले नाही. उलट बेकारी आणि बेरोजगारी वाढली आहे. तरुणांना आहे त्या नोकऱया सोडाव्या लागत आहेत. त्याविरोधात जनमत संघटीत करण्यासाठी अराजकीय मंचाची स्थापना झाली आहे.

 आशीष देशमुख, भाजप आमदार

हे सरकार कुणालाही विश्वासात न घेता परस्पर निर्णय लादत आहे. एक माणूसच परस्पर निर्णय घेतोय. लोकशाही मार्गाने काहीच होताना दिसत नाही. त्यामुळे या सरकारवर घाव घालण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत- पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते

भाजप सरकारविरोधात रान उठवणार

मुंबईतील बैठकीत स्थापन झालेला संयुक्त अराजकीय मंच मोदी सरकारच्या देशविनाशक धोरणांविरोधात देशभरात जनजागृती करून रान उठवणार आहे. भाजप नेते यशवंत सिन्हा, अरुण शौरी, कीर्ती आझाद, काँग्रेसचे मनीष तिवारी, रेणुका चौधरी आदी नेते भाजपच्या पराभवासाठी मोहीमच उघडणार आहेत.