मी संघाचे निमंत्रण स्वीकारले नसते – चिदंबरम

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निमंत्रण स्वीकारल्याचे पडसाद उमटत आहेत. मला संघाने निमंत्रण दिले असते तर ते स्वीकारले नसते असे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे. मुखर्जी यांनी आता हे आमंत्रण स्वीकारले आहे. त्यामुळे आता हे योग्य की अयोग्य यावर चर्चा करणे व्यर्थ आहे, मात्र आता संघाच्या विचारांमध्ये काय गडबड आहे, हे मुखर्जींनी आपल्या भाषणातून सांगावे असा सल्लाही चिदंबरम यांनी दिला आहे.

यापूर्वी काँग्रेसचे प्रवक्ता अभिषेक मनू सिंघवी यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया दिली होती. ‘राष्ट्रपती झाल्यानंतर मुखर्जी यांनी राजकारण सोडले आहे. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमात ते उपस्थित राहिल्यास त्याचा त्यांच्या विचारधारेशी संबंध नाही. मुखर्जी यांनी ५० वर्षाच्या राजकीय आयुष्यात जे सांगितले, जे आचरण केले त्यावरुन त्यांच्याबाबत समजूत करावी’, असे सिंघवी यांनी स्पष्ट केले होते.

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते सी.के. जाफर शरीफ यांनी मात्र मुखर्जी यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमासाठी नागपुरला जाणार आहात हे समजल्यावर मला खूप आश्चर्य वाटले. आपल्या पक्षाने जातीय शक्तीच्या विरोधात नेहमी संघर्ष केला आहे. तुम्ही संघाच्या कार्यक्रमाला जाणार हे समजल्यावर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना धक्का बसलाय. त्यांचा तुमच्या या निर्णयाला विरोध आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत असताना तुम्ही संघाच्या कार्यक्रमात जाणे योग्य नाही’. या शब्दात मुखर्जी यांना पत्र लिहून जाफर शरीफ यांनी नाराजी व्यक्त केली होती.