‘मै भी चौकीदार हूँ’ गाण्यातील दृश्यावर काँग्रेसचा आक्षेप

170

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपच्या ‘मै भी चौकीदार हूँ’ या गाण्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणगाड्यावर उभे राहून या गाण्याचे चित्रीकरण केल्याचा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. लष्कराच्या रणगाड्यावरील चित्रीकरण तसेच लष्करातील जवानांचे दृश्य हे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन असून त्यावर कारवाई करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे सचिव तौफीक मुल्लानी यांनी केली आहे.

यासंदर्भात काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. मागील दोन दिवस सोशल मीडियावर ‘मै भी चौकीदार हूँ’ हे गाणे भाजपकडून प्रसारित केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हे गाणे ट्विट केले आहे. या गाण्यात नरेंद्र मोदी रणगाड्यावर दिसतात. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 9 मार्च 2019 रोजीच्या परिपत्रकानुसार राजकीय पक्षांना प्रचारात हिंदुस्थानी लष्कर आणि संबंधित प्रतिकात्मक छायाचित्रांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या