Pune लायकी काढणाऱ्या अतिरिक्त आयुक्तांना महापौरांच्या दालनात मारहाण, काँग्रेस नगरसेवकांवर गुन्हा दाखल

4

सामना प्रतिनिधी । पुणे

नगरसेवकांची लायकी काढल्याने पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौरांच्या दालनात मारहाण करण्यात आली. याविरोधात काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर यांच्यासह 15 ते 17 कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेने जलपर्णी काढण्यासाठी तब्बल 23 कोटींची निविदा काढली आहे. यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर होत आहे. याविषयावर सोमवारी दुपारी चारच्या सुमारास महापौरांच्या दालनात चर्चा सुरू होती. यावेळी नगरसेवकांनी अधिकारी चोऱ्या करतात असा आरोप केला. त्याला प्रत्युत्तर देताना अतिरिक्त आयुक्त निंबाळकर यांनी नगरसेवकांना ‘तुमची लायकी काय?’ असा जाब विचारला. त्यावरून महापौरांच्या दालनातच निंबाळकर यांना संतप्त कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

चक्क अतिरिक्त आयुक्तांनाच मारहाण केल्याने एकच खळबळ उडाली. यानंतर महापालिकेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली. रात्री उशीरा निंबाळकर यांनी काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर यांच्यासह 15 ते 17 कार्यकर्त्यांवर मारहाण करणे, धमकावने, सरकारी कामात अडथळा आणणने, जमाव जमवून दहशत निर्माण करणे या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विजयकुमार शिंदे करत आहेत.