लातूरची काँग्रेसची गढी पुन्हा ढासळली; विधानसभा निवडणुकीवर परिणामाची शक्यता

4

सामना ऑनलाईन । लातूर

लातूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर तुकाराम शृंगारे यांनी तब्बल 289111 मताधिक्याने विजय मिळवला. लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, काँग्रेसची ही गढी मजबूत ढासळल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये लातूर जिल्ह्यातील लातूर शहर विधानसभा मतदारसंघ, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ, अहमदपूर विधानसभा मतदारसंघ, उदगीर विधानसभा मतदारसंघ आणि निलंगा विधानसभा मतदारसंघाचा तर नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपाने हा मतदारसंघ 2 लाख 52 हजाराच्या मताधिक्याने जिंकला होता. मात्र, हा मोदी लाटेचा विजय असल्याचे काँग्रेसला वाटत होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले उद्योजक मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी चांगली लढतही दिली परंतु काँग्रेस पक्षाची ताकद दिसून आली नाही. त्याचा परिणाम निकालावर दिसून आला. देशमुख परिवारातील आमदार अमित देशमुख, माजी आमदार दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य धिरज देशमुख यांनी प्रचारसभा घेतल्या परंतु काँग्रेस उमेदवाराला विजयी करण्यात ते अपयशी ठरले.

सर्वाधिक मताधिक्य शिवसेना-भाजपा महायुतीला मिळाले ते लोहा विधानसभा मतदारसंघात. काँग्रसचे मच्छिंद्र कामत यांना 37208 मते मिळाली तर महायुतीचे सुधाकर शृंगारे यांना 105870 मते मिळाली. तब्बल 68662 एवढे मताधिक्य या मतदारसंघाने महायुतीला दिले. अहमदपूर विधानसभा मतदारसंघाने त्या खालोखाल 68058 एवढे मताधिक्य सुधाकर शृंगारे यांना दिले. कामंत यांना 54751 मते मिळाली तर शृंगारे यांना 122809 मते मिळाली. साखर कारखानदारीचा बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवारास 75332 मते मिळाली तर महायुतीच्या उमेदवारास 110628 मते मिळाली. 35296 एवढे मताधिक्य या मतदारसंघाने मिळवून दिले. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात अधिक मताधिक्य महायुतीस मिळेल असे म्हटले जात होते. परंतु केवळ 13682 एवढेच मताधिक्य मिळाले. काँग्रेस उमेदवार कामत यांना शहर विधानसभा मतदारसंघात 85469 मते मिळाली तर महायुतीचे शृंगारे यांना 99151 मते मिळाली. उदगीर विधानसभा मतदारसंघात कामंत यांना 58538 मते मिळाली तर शृंगारे यांना 103639 मते मिळाली. 45105 मतांची आघाडी या मतदारसंघाने दिली. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या कामत यांनी 59538 मते मिळवली तर महायुतीचे उमेदवार शृंगारे यांनी 115493 मते मिळवली. 55955 मतांची आघाडी या मतदारसंघाने दिली. टपाली मतदानातही महायुतीचे शृंगारे यांनी 2356 मतांची आघाडी मिळवली. कामंत यांना 1549 मते मिळाली तर शृंगारे यांना 3905 मते मिळाली. या निकालावर आगामी विधानसभा निवडणुकीचे आडाखे सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते बांधत आहेत. काँग्रेसला आपल्या जागा वाचवण्यासाठी काम करावे लागणार आहे. तर महायुतीस मताधिक्य आणखी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.