सत्तेवर आल्यास ४ आठवड्यात पंजाब ड्रगमुक्त करु – काँग्रेसचा जाहिरनामा

 

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाने आज सोमवारी जाहिर केला. काँग्रेसला सत्ता मिळाली तर केवळ चार आठवड्यात पंजाब ड्रगमुक्त करू, अशी घोषणा काँग्रेसने केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काँग्रेसचा जाहिरनामा प्रसिद्ध केला.

दिल्लीत जाहिरनामा प्रसिद्ध करताना पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग आणि जाहिरनामा मसुदा समितीचे अध्यक्ष राजिंदर कौर भट्टल, अंबिका सोना आदी उपस्थित होते. काँग्रेसला सत्ता मिळाली तर बेघरांना घरे, शेतक-यांची कर्जमाफी, मुलींना पीएच.डी. पर्यत मोफत शिक्षण देऊ असे आश्वासन दिले आहे.

याखेरीज पंजाबची गरज पूर्ण केल्यानंतर पाणी इतरांना देण्यात येईल. व्यापार आणि उद्योगासाठी ५ रुपये युनिट दराने वीज पुरवठा, तरुणांनी दर महिन्याला २५०० रुपये बेरोजगारी भत्ता तसेच प्रत्येक घराला रोजगार देऊ असे काँग्रेसने जाहिरनाम्यात म्हटले आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्त्वात पंजाबचा विकास होईल. त्यांना मोठा अनुभव आहे. आम्ही पंजाबमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, शेतीसाठी अधिक चांगले काम करू. अकाली सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप यावेळी काँग्रेसने केला.