नगराध्यक्ष गवळी यांचे  हेतुपुरस्सर बदनामी करण्याचे षड्यंत्र: शिवसेना नगरसेवकांचा पत्रपरिषेदेत आरोप


सामना प्रतिनिधी । बुलढाणा 

हे शिवसेनेचे नगर सेवक राजीनामा देऊन काँग्रेसला पाठिंबा देतील अश्या वावड्या काँग्रेसचे नगराध्यक्ष कासम गवळी उठवत असून यात काही तथ्य नसल्याचे सांगत आम्ही सदैव खासदार  प्रतापराव जाधव व शिवसेनेसोबतच राहू अशी ग्वाही नगरसेवक तौफिक कुरेशी, हानिफ गवळी व गणेश लष्कर यांनी विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषेदेत दिली.

यावेळी पुढे बोलताना   हानिफ गवळी यांनी  सांगितले की 2011साली  त्यांनी  गवळी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी गवळी यांनी साम दाम दंड भेद वापरले तरी ही माझा अल्पशा मताने म्हणजेच 7 मतांनी पराभव करू शकले. गवळी यांनी समाजातील लोकांना मोठे केले नाही केवळ समाजाचा राजकीय फायदा घेतला. त्यांनी समाजातील लोकांना आगामी काळात उमेदवारी दयावी अशी मागणी हानिफ गवळी यांनी केली. यावेळी

तौफिक कुरेशी यांनी  सांगितले की मी साधा शिवसैनिक  असताना 2014 ला काँग्रेसच्या नगरसेवकला हाताशी धरून मला भांडणात गोवण्याचा प्रयत्न केला होता  त्यावेळी खासदार  प्रताप राव जाधव हे माझ्या पाठीशी खंबीर पणे  उभे राहिले. त्यानंतर त्यांनी मला शिवसेनेची  उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यामुळे कितीही अशा वावड्या उठवल्या तरी आम्ही खा जाधव यांच्याशी  बेईमानी करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गणेश लष्कर बोलले की मी वडार समाज संघटनेचे जिल्हा स्तरावर काम करत असून नगराध्यक्ष कासम गवळी नाहक आमची बदनामी करत आहेत. आम्ही शेवटच्या श्वासापर्यत खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांचे नेतृत्वात शिवसेनेचे काम करू असे ते म्हणाले.

गरिबांची चेष्टा करतात

या वेळी तिनही नगरसेवक म्हणाले की आमच्यातील ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांना नगराध्यक्ष काहीच आमिष दाखवत नाही वा त्यांच्या विषयी अफवा पसरवत नाही पण आम्ही गरीब आहे तर आमच्या गरीबीची थट्टा करतात मात्र कोणी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही काँग्रेसचा हा डाव उधळून लावु असे ही नगरसेवक म्हणाले. या पत्रपरिषदेला  उपजिल्हा प्रमुख राजू गाडेकर तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर, गटनेते संजय जाधव, न प  उपाध्यक्ष जयचंद बाठीया, सर्व शिवसेना सभापती व नगरसेवक या पत्रकार परिषेदेला हजर होते.