थांबा…थांबा…भूकंप व्हायचाय-काँग्रेस


सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

राहुल गांधींनी गुजरातमधील मेहसाणा इथे घेतलेल्या जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सहारा कंपनीकडून पैसे घेतल्याचा आरोप केला. हे आरोप याआधीही झाले होते, त्यामुळे प्रश्न उपस्थित झाला की हीच ती कागदपत्र आहेत का ज्याच्याआधारे राहुल गांधी भूकंप घडवण्याची भाषा करत होते. (राहुल गांधींचे आरोप ऐकण्यासाठी हा व्हिडीओ पाहा)

माझ्याकडे मोदींविरूद्ध असे पुरावे आहेत ज्यामुळे भूकंप घडेल असा छातीठोक दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी संसदेत केला होता. हा आरोप केल्यानंतर त्यांची मेहसाणा इथे पहिलीच जाहीर सभा होती. त्यामुळे अपेक्षा होती की मोदींच्या राज्यात येऊन ते या सभेत भूकंप घडवतील. मात्र त्यांनी मोदींवर याआधी अनेकदा लावलेले आरोप पुन्हा एकदा वाचून दाखवले त्यामुळे  राहुल गांधींची भूकंप घडवण्याची भाषा हा फुसका बार आहे की काय अशी चर्चा सुरू झाली.

राहुल गांधी यांचं समर्थन करण्यासाठी काँग्रेस पुढे सरसावलीय. ज्या पुराव्यांबाबात राहुल गांधींनी संसदेत उल्लेख केला त्याबद्दल ते बोललेले नाहीत असं काँग्रेसने म्हटलंय. आमच्याकडे मोदींच्या काळ्या पैशाबाबत माहिती आहे आणि आम्ही ती लवकरच जनतेसमोर मांडू असं काँग्रेसमधल्या एका नेत्याने सांगितलं.

काँग्रेसमधल्याच इतर काही नेत्यांनी राहुल गांधी यांच्या मेहसाणातील जाहीर सभेत केलेल्या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी वातावरण निर्मिती केली मात्र जुनेच आरोप पुन्हा केले, यामुळे राहुल गांधींच्या भूकंप घडवण्याबाबतच्या विधानातील गांभीर्य निघून जाईल असं काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटत आहे.