मनपाच्या गलथान कारभाराच्या निषेधार्थ लातूरात काँग्रेसचा कंदील मोर्चा

सामना प्रतिनिधी । लातूर

शहर महानगर पालिकेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व मनपाच्या रस्ते, पाणी, वीज विभागातील गलथान कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांनी मंगळवारी गांधी चौक ते महानगरपालिका असा कंदिल मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन दिले.

लातूरकरांना भरमसाठ आश्वासने देवून सत्तेत आलेल्या भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी लातूरकरांना मुलभूत सुविधांपासूनही वंचित ठेवले आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगकरांनी निवडणूकीत लातूरकरांना दररोज पाणीपुरवठा करु, विजेची सोय करु व शहरातील रस्ते खड्डेमुक्त करु यासह अनेक आश्वासने दिली होती परंतु सध्या लातूरकरांना मुलभूत सोयीसुविधाही उपलब्ध होत नाहीत. अनेक समस्यांना तोंड देत नागरीक हैराण झाले आहेत. मनपाच्या विविध विभागातील गलथान कारभारावर वेळीच आळा घालून नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात यासाठी काँग्रेस नगरसेवकांच्या वतीने कंदील मोर्चा काढण्यात आला. माजी महापौर अ‍ॅड.दिपक सूळ यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात सहभागती नगरसेवक, नगरसेविकांनी घागर घेवून व दिवसा कंदील पेटवून मनपातील गलथान कारभारावर प्रकाश टाकून सत्ताधाऱ्यांच्या डोळयात अंजन टाकण्याचेच काम केले.

मोर्चात सहभागी नगरसेवकांनी हातात रिकाम्या घागरी, पेटविलेले कंदील घेवून व उलटी हालगी वाजवून लातूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या महापौर व पालकमंत्री यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. महापालिकेत मोर्चा आल्यानंतर मनपा आयुक्त कौस्तूभ दिवेगावकर यांच्या दालनात उपायुक्त वसुधा फड यांनी निवेदन स्विकारले.

या मोर्चात नगरसेवक पप्पू देशमुख, पुनित पाटील, संचिन बंडापल्ले, सचिन मस्के, युनुस मोमिन, विजय साबदे, कैलास कांबळे, व्यंकटेश पुरी, दत्ता सोमवंशी, हनिफ शेख, इम्राण सय्यद, नगरसेविका उषा कांबळे, हारुबाई बोईनवाड, कांचन अजनीकर, दिप्ती खंडागळे, मिनाताई लोखंडे, गौरबी बागवान, गोरबा लोखंडे, आकाश भगत, अ‍ॅड.फारख शेख, अ‍ॅड.बोरुळे पाटील, सुमित खंडागळे, सलिम टाके, इम्राण गोंद्रीकर, राजीव गवळी, जय ढगे, जमालुद्दीन मणियार, मैनोद्दीन सौदागर, रमेश कांबळे आदीसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.