सल्लागारांनी राहुल गांधींना ‘सल्ला’ देऊन ‘गार’ केलं, काँग्रेसमध्ये असंतोष

25

मी बोललो तर भूकंप होईन अशी गर्जना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चेला गेलेल्या राहुल गांधी यांच्यावर त्यांच्याच पक्षातले नाराज झाले आहेत. मात्र ही नाराजी त्यांच्यापेक्षा जास्त ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर आहे. कारण त्यांच्या सल्ल्यानुसार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असं सांगितलं जात आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस खासदारांचं एक शिष्टमंडळ राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलं होतं. यंदाच्या हिवाळी अधिवेशन नोटाबंदीच्या मुद्दावरून प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळादरम्यान राहुल गांधी यांनी आरोप केला होता की ‘मला सभागृहात बोलू दिलं जात नाही, मी जर बोललो तर भूकंप होईल कारण माझ्याकडे नरेंद्र मोदींनी केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात माहिती आहे’. सगळे विरोधक नोटाबंदीच्या मुद्दावर एकवटले होते. मात्र शेवटच्या दिवशी राहुल गांधी पंप्रधानांना भेटल्यानं विरोधातली हवाच निघून गेली. या सगळ्याला ज्योतिरादित्य जबाबदार आहेत असं काँग्रेसमधल्या काहीजणांना वाटत आहे.
राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांच्या भेटीसाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भेटीची वेळ मागितली होती. पक्षातील मोठ्या नेत्यांना ऐनवेळी या भेटीची कल्पना देण्यात आली आणि या शिष्टमंडळात सहभागी होण्यास सांगण्यात आलं. असं करण्याआधी सिंधिया यांनी कोणालाही विचारलं नाही आणि माहितीही दिली नाही. सिंधिया सभागृहातही आपल्याला बोलू देत नाही असाही काही काँग्रेस खासदारांचा आक्षेप आहे, यामध्ये राहुल गांधी गटातल्या खासदारांचाही समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या