कार्लेखिंड-रेवस रस्त्यासाठी काँग्रेसने वाजविली ‘घंटा’


सामना प्रतिनिधी । अलिबाग 

तीन वर्षात रस्ता गेला खड्ड्यात, अशा दर्जाहीन कामामुळे प्रवाशांना पाठीचे, मणक्यांचे विकार जडत आहेत. त्यामुळे खड्ड्यांच्या रस्त्यातून प्रवाशांना बाहेर काढावे आणि दर्जेदार रस्ता तयार करावा, या मागणीसाठी अलिबाग तालुका युवक काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाशिवरे गावच्या नाक्यावर घंटा वाजवून उपस्थित अधिकार्‍यांचे लक्ष वेधून घेतले.
अलिबाग, सारळ, सारळ-रेवस, शिरवली, मानकुले या रस्त्यासाठी रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. प्रथमेश पाटील आणि अलिबाग, मुरूड युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. कौस्तुभ पुनकर यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या घंटानाद आंदोलनाला महिला काँग्रेसच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर, राजाभाऊ ठाकूर, अलिबाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष योगेश मगर,   आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कार्लेखिंड-रेवस आणि शिरवली-मानकुले रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. तीन वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले. मात्र रस्ता पुन्हा खड्ड्यात गेला. 13 कि.मी.च्या रस्त्यावर जागोजागे खड्डे पडले आहेत. प्रवासी, खाजगी वाहनांची मोठ्या संख्येने वाहतूक या रस्त्यावर होत असते. त्यामुळे हा रस्ता सुसज्ज असणे आवश्यक होते. अ‍ॅड. प्रथमेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात खड्ड्यांच्या रस्त्यांमुळे प्रवाशांना होणार्‍या वेदना आणि आंदोलनाची गरज या संदर्भात माहिती दिली.
आणि रस्त्याच्या कामाला सुरूवात

अलिबाग युवक काँग्रेसच्या वतीने रस्त्याच्या कामासाठी करण्यात येणार्‍या आंदोलनासंदर्भात 8 जानेवारी रोजी बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता अंकुश चव्हाण यांना निवेदन दिले होते. आंदोलनाच्या एक दिवस अगोदरच खड्डे भरण्याच्या कामाला सुरूवात झाली. त्यामुळे काँग्रेसच्या निवेदनाची आणि आंदोलनाची उशिरा का होईना दखल घेण्यात आल्याचे दिसून आले.

रस्त्याच्या कामासाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज कार्यकारी अभियंता कांबळे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन अलिबाग-सारळ, शिरवली-मानकुले रस्त्याचे काम मंजूर झाले असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न राहतील, अशी ग्वाही आंदोलनकर्त्यांना दिली.