मोदींच्या हेलिकॉप्टरमधून उतरवला रहस्यमय बॉक्स

modi-helicopter-box

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशभरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. अशा धामधुमीत आता एका ब्लॅक बॉक्सने खळबळ उडवून दिली आहे. कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधून एक काळय़ा रंगाचा बॉक्स उतरवण्यात आला. हा बॉक्स तातडीने एका वाहनात ठेवण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओच काँग्रेसने जारी केला आहे. काँग्रेसने कर्नाटकच्या मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर याबाबतचा मुद्दा उपस्थित केला असून याबाबतची माहिती आपल्याकडे आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे.

काय होते बॉक्समध्ये, चौकशी झालीच पाहिजे

ब्लॅक बॉक्सबाबतचा व्हिडीओ जारी केल्यानंतर लगेचच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली. या बॉक्समध्ये नेमके काय होते याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसने या प्रकरणाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचेही ते म्हणाले. या घटनेचा व्हिडीओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दिनेश गुड्डू राव यांनीही ट्विटरद्वारे शेअर केला आहे.

बॉक्स गेला कुठे? ती कार कुणाची होती?

हेलिकॉप्टरमधून उतरवण्यात आलेला काळा बॉक्स एका खासगी इनोव्हा कारमध्ये ठेवण्यात आला. ही कार मोदींच्या ताफ्याचा भाग नव्हती. असे जर असले तर तो बॉक्स नेमका कुठे गेला? ती गाडी कुठे गेली? असे प्रश्न आनंद शर्मा यांनी उपस्थित केले असून त्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे.

काय आहे या व्हिडीओत?

या व्हिडीओत कुठेही हेलिकॉप्टर दिसत नाही. केवळ हेलिकॉप्टरचा एक पंखा दिसत आहे. एक इनोव्हा गाडी काही अंतरावर उभी आहे. काहीजण हेलिकॉप्टरमधून उतरतात. त्यानंतर दोघे ब्लॅक बॉक्स घेऊन इनोव्हा गाडीच्या दिशेने धावत जाताना दिसत आहेत. गाडीपर्यंत पोहोचल्यानंतर ब्लॅक बॉक्स गाडीत ठेवण्यात येतो. त्यानंतर लगेचच गाडी पुढे मार्गस्थ होते. ही घटना पाहणाऱया लोकांमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. काहीजण म्हणत होते त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कपडे असावेत तर काहीजण म्हणत होते त्यात पैसे असावेत.

आणखी काय म्हणाले काँग्रेस नेते

या बॉक्समध्ये रोकड होती का याचीही चौकशी व्हायला पाहिजे. पंतप्रधान मोदींच्या हेलिकॉप्टरमधून नेमके काय नेण्यात येत होते याची आम्हाला माहिती मिळायलाच हवी. निवडणूक आयोग नक्कीच या प्रकरणाची कसून चौकशी करेल याची आम्हाला खात्री आहे.