इंधनदर वाढीविरोधात राहुरीत काँग्रेसचा निषेध मोर्चा

सामना प्रतिनिधी, राहुरी

देश व महाराष्ट्र चालविणाऱ्या भाजप सरकारने कष्टकरी शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व सर्वसामान्य माणसाची चांगलीच जिरवली असून हे सरकार संपूर्ण देशाला कार्पोरेट किंमतीप्रमाणे चालवत असल्याचा स्पष्ट आरोप राहुरी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.

पेट्रोल, गॅस, डिझेल या जीवनावश्यक इंधनामध्ये सातत्याने सुरू असलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ आज राहुरी तालुक्यात बंद पुकारून तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब यादवराव तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी तहसिल कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीपासून निघालेला मोर्चा राहुरी तहसिल कार्यालयावर गेल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष रावसाहेब यादवराव तनपुरे म्हणाले की राज्यातील भाजप सरकारचा खोटे बोल मात्र रेटून बोल हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. कपाशीच्या पिकाला बोंडअळीचा प्रादुर्भाव तर ऊसाच्या पिकावर हुमणी अळीचे संकट आल्याने राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांबाबत सुरुवाती पासूनच नकारात्मक धोरण राबविणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकविण्यासाठी आपसातील मतभेद बाजूला ठेवून विरोधी पक्षांनी एकत्रित लढा देण्याची गरज असल्याचे रावसाहेब तनपुरे यांनी म्हटले.

राहुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे म्हणाले की, एकीकडे शेती मालाचे बाजारभाव मातीमोल झाले असताना दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, खते किंमती वाढवून शेतकरी देशोधडीला लावण्याचे काम राज्यातील सरकारने चालविले आहे. तर सर्वसामान्य जनता राज्यकर्त्यांच्या कारभाराने त्रस्त झाली आहे. राजेंद्र लोंढे म्हणाले की राज्यकर्त्यांच्या हुकूमशाही कारभारामुळे ग्रामीण भागातील शेतकरी पिळून निघाला आहे.

काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या निषेध मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. दरम्यान बोटावर मोजण्याइतके पाच पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते सामील झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींनी मात्र या मोर्चाकडे पाठ फिरवली होती. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर तहसीलदार दौंडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. काँग्रेसच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राहुरी तालुका बंदला दुपारपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी १ वाजेनंतर बाजार पेठेतील व्यवहार सुरू झाले.

summary- congress strikes against price hike in rahuri