कोविंद यांना काँग्रेसचा दलित महिला उमेदवाराचा पर्याय

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपल्याशी कोणतीही चर्चा न करता भाजपने राष्ट्रपती पदासाठी रामनाथ कोविंद यांचं नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्याने काँग्रेस आणि अन्य विरोधक संतापाने लालबुंद झालेत. भाजपाला अडचणीत टाकण्यासाठी काँग्रेसने मित्र पक्षांना सोबत घेऊन एक रणनीती आखली आहे.

भाजपाने राष्ट्रपती पदासाठी दलित चेहरा पुढे केला आहे. जर कोविंद यांच्या नावाला विरोध केला तर आपल्यावर दलित विरोधी असल्याचा आरोप होऊ शकतो हे कळल्याने या पदासाठी काँग्रेसने मीरा कुमार हे नाव पुढे केलं आहे. मीरा कुमार या दलित आहेत. शिवाय महिला उमेदवार असल्याने त्याचा राजकीयदृष्ट्या भाजपावर कुरघोडी करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो, हे काँग्रेसने ओळखलं आहे.

राष्ट्रपती पदासाठी सर्वसाधारणपणे उच्चशिक्षित चांगल्या चारित्र्याचा उमेदवार दिला जातो. भाजपाने जातीचं गणित या निवडीमध्ये आणल्याने काँग्रेसनेही भाजपाला जशास तसे उत्तर द्यायचं ठरवलेलं दिसतंय. त्यामुळेच कदाचित मीरा कुमार यांचं नाव पुढे केलं असावं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. कारण, मीरा कुमार यांनी लोकसभेच्या अध्यक्षा म्हणूनही काम सांभाळलेलं आहे.

कोण आहेत मीरा कुमार-
मीराकुमार या माजी उपपंतप्रधान जगजीवन राम यांच्या कन्या आहेत.
लोकसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्वया त्या पहिल्या दलित महिला आहेत
मीरा कुमार या कायद्याच्या पदवीधर आहेत
मीरा कुमार या आयएफएस अधिकारी होत्या.
त्यांनी १९७० च्या दशकात हिंदुस्थानच्या परराष्ट्र खात्यात कामाला सुरुवात केली