पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीविरोधात काँग्रेस करणार आंदोलन

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पेट्रोल आणि डिझेल यांच्या वाढत्या किमतीमुळे हिंदुस्थानातील जनता त्रस्त झाली आहे. याचा थेट परिणाम रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतीवरही होत आहे. हीच बाब लक्षात घेत पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती विरोधात काँग्रेस केजरीवाल सरकार आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्याच्या तयारी आहे. दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अजय माकन यांनी सांगितलं की, केजरीवाल यांनी दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलवरील वॅट वाढवला आहे. ज्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलवर १०४.४२ टक्के तर डिझेलवर २२६.०२ टक्के कर वाढला आहे.

दिल्लीत सप्टेंबर २०१७पर्यंत १०० रुपयांच्या पेट्रोलवर ५१.७८ रुपये कर आहे, तर डिझेलवर ४४.४० रुपये कर आहे. केजरीवाल यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील वॅटमध्ये वाढ का केली? असा सवाल माकन यांनी उपस्थित केला आहे. आतंरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढण्याचं कारण काय असा सवाल माकन यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

माकन यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात पेट्रोल-डिझेलच्या किमती आणि भाजप सरकारच्या काळातील किेमती यांची तुलनात्मक आकडेवारी नागरिकांसमोर ठेवली आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात पेट्रोलवरील कर १७.८३ रुपये इतका होता, तो आज ३६.४४ रुपये एवढा आहे. तर डिझेलवरील कर काँग्रेस काळात ७.९५ रुपये एवढा होता, तो आज २५.९२ रुपये एवढा आहे.