जीव धोक्यात घालून जखमीला शोधायला गेलेल्या कॉन्स्टेबलचा मृत्यू

अपघातात एस. व्ही. पाटील यांचा मृत्यू अंधेरी स्थानकाजवळ दुर्दैवी घटना

प्रतिनिधी । मुंबई

अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ एक जखमी पडलेला असल्याचे समजताच त्याचा शोध घेण्यासाठी स्टेशन मास्तर आणि हमालांसह कॉन्स्टेबल एस.व्ही. पाटील हेदेखील गेले. रात्रीच्या काळोखात त्या जखमीला शोधत असतानाच पाटील यांच्यावर काळाने घाला घातला. विरारला निघालेल्या फास्ट लोकलची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेल्या पाटील यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

एस. व्ही. पाटील हे सोमवारी रात्रपाळी कर्तव्यावर होते. रात्री उशिरा स्थानकाजवळ एक इसम जखमी अवस्थेत पडले असल्याची अनाऊन्समेंट करून स्टेशन मास्तर सोनवणे केली. यानंतर त्या जखमी व्यक्तीला शोधण्यासाठी सोनावणे, चार हमाल तसेच पाटील निघाले. अंधेरी स्थानकातून जखमीचा शोध घेत रेल्वे रुळावरून सर्व चालले होते. यादरम्यान, विरार फास्ट लोकल आली. ही लोकल इतरांनी चुकवली. मात्र पाटील यांना लोकलची धडक बसली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वी डॉक्टरांनी पाटील यांना मृत घोषित केले.